सांगोला तालुक्यातील महूद गावामध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला असून, त्याच्यावर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, महूद गावामध्ये तालुका आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यासह खाजगी डॉक्टर यांना संशयित रुग्ण आढळून आल्यास तात्काळ तालुका आरोग्य विभागाला माहिती द्यावी. यासह ग्रामपंचायत प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सूचना गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी दिल्या आहेत.
महूद तालुका सांगोला येथील ३५ वर्षीय इसमाला जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. या रुग्णाने सुरुवातीला गावातील खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. परंतु त्याला अधिक त्रास सुरू झाल्यानंतर पुढील उपचारासाठी पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान रक्त लगवी व शौच तपासणी केल्या नंतर जीबीएसचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती पंढरपूर येथील डॉक्टरांनी दिली. याबाबत माहिती मिळताच
आरोग्य विभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गावामध्ये सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. घरोघरी जाऊन तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यासह ग्रामपंचायतीला गावातील सांडपाणी व्यवस्थापन, गटार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेची पाहणी करण्याबाबत गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून सूचना देण्यात आले आहेत.
जीबीएस रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने गावामध्ये घरोघरी जाऊन पाण्याचे नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. तसेच खबरदारीच्या सर्व उपाययोजनांची कार्यवाही प्रशासनाने सुरु केली आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी पाणी उकळून प्यावे. घर परिसर स्वच्छ ठेवावा. वैयक्तिक स्वच्छतेवर अधिक भर द्यावा. स्वच्छ आणि ताजे अन्न खावे. शिळे अन्न खाऊ नये. तालुक्यातील गावोगावच्या सर्व ग्रामस्थांनीही या सूचनांचे पालन करावे. अचानक पायांना हाताला अशक्तपणा येणे किंवा लकवा भरणे, आकस्मित उद्भवणारे पॅरलेस अथवा अशाप्रकारे कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश खांडेकर यांनी केले आहे.
जीबीसी आजाराबाबतचे वेळेत गांभीर्य ओळखून न्यूरो लॉजिकल सोसायटी ऑफ पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कारवाई व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. याबाबत कोणी घाबरून न जाता, नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. वैयक्तिक स्वच्छतेवर अधिक भर द्यावा, लक्षणे आढळून आल्यास तातडीने नजीकच्या सरकारी दवाखान्याशी संपर्क साधावा.
– डॉ. अविनाश खांडेकर तालुका आरोग्य अधिकारी
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक