लाडकी बहीण योजना; तालुक्यात ८४ हजार लाडक्या बहिणी लाभधारक
सांगोला (नाना हालंगडे):’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत, सांगोला तालुक्यातील ५०० लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर चारचाकी वाहने असल्याचे आढळले आहे. या कारणास्तव, या महिलांना योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अजूनही सर्वेचे काम सुरू असल्यामुळे चारचाकी गाडीधारक लाडक्या बहिणी वाढणार आहेत.
सांगोला तालुक्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजने अंतर्गत ८४ हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. आता या योजनेतील लाभार्थ्यांसाठी शासनाने नवीन अटी घातल्यामुळे अनेक लाभार्थी महिलांची नावे वगळली जाणार आहेत. राज्य शासनाने या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी परिवहन विभागाच्या मदतीने चारचाकी वाहनधारकांची यादी तयार केली आहे. या यादीनुसार तपासणीत चारचाकी वाहन असल्याचे सिद्ध झाल्यास, संबंधित महिलांचे नाव योजनेतून वगळले जाईल असे सांगण्यात आले आहे. राज्य शासनाने अपात्र लाभाथ्यर्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्याचे आवाहन केले होते, परंतु कमी प्रतिसाद मिळाल्याने आता चार चाकी वाहने असणाऱ्या लाडक्या बहिर्णीचा शोध सुरू केला आहे. महिलांच्या नावे चार चाकी वाहने आढळून येत आहेत अशा लाभाथ्यांची नावे योजनेतून वगळण्याची कारवाई सुरू आहे.
सांगोला तालुक्यात लाडक्या बहिणीच्या नावावर चार चाकी वाहन असेल तर त्याचे नाव लाभार्थीच्या यादीतून वगळण्याचे कामकाज सुरू आहे. सांगोला तालुक्यात आत्तापर्यंतच्या सर्वेनुसार ४९८ महिलांची नावे सापडली असून त्यांना या योजनेचा लाभ बंद केला जाणार आहे. अजूनही तपासणीचे कामकाज सुरू असून यापेक्षा जास्त महिला या योजनेतून वगळल्या जाणार आहेत. सुरुवातीला या योजनेचा लाभ मिळाला. परंतु काही कारणास्तव आता या योजनेतून नावे वगळली जात असल्यामुळे लाडक्या बहिणीकडून सरकारच्या या धोरणाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक