सर्वांनी पक्षी संवर्धनाचे कार्य केले पाहिजे – राजेंद्र यादव

0

सांगोला महाविद्यालयात चिमणी दिन साजरा!

सांगोला ( प्रतिनिधी)-पक्षांचे संवर्धन ही काळाची गरज असून ग. दि. माडगूळकर यांच्या कवितेतील “या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या, जाहल्या तिनी सांजा” अशी सांज वेळ पक्षांच्या जीवनात येऊ नये त्यासाठी विद्यार्थी आणि सर्व नागरिकांनी पक्षी संवर्धनाचे कार्य केले पाहिजे असे मत आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पत्रकार राजेंद्र यादव यांनी २० मार्च जागतिक चिमणी दिवस निमित्त सांगोला महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

सांगोला तालुक्यात अनेक नागरिक, विद्यार्थी पक्षी संवर्धनाचे कार्य करीत असल्यामुळे सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चिमण्यांचा वावर आढळून येतो. प्रा. डॉ. विधीन कांबळे यांच्या प्रयत्नामुळे व प्रेरणेने अनेक लोक पक्षी संवर्धनाच्या चळवळीत सहभागी होत आहेत असे ते म्हणाले. आजच्या  युवकांनी खऱ्या अर्थाने या चळवळीत सहभागी होण्याची गरज आहे. भविष्यासाठी पर्यावरण जतन करण्याची जबाबदारी आजच्या युवकांनी घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी कर्करोग आणि जैवविविधता याचा संबंध सांगताना सांगितले की, पक्षांची संख्या कमी झाल्यास कीटकांची संख्या वाढते व कीटकांच्या बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक औषधांचा अथवा कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि ही रसायने मानवी शरीरात जातात ज्यामुळे असाध्य अशा  कर्करोगाला  लोक बळी पडत आहेत.  आपले आरोग्य निरोगी आणि आरामदायी करायचे असेल तर पर्यावरणाचे आणि पक्षी संवर्धनाचे कार्य सर्वांनी हाती घेतले पाहिजे असे सांगितले.

प्रा. डॉ. विधीन कांबळे यांनी परिसरातील दुर्लक्षित पक्षी या विषयावरती सादरीकरण करून विद्यार्थी व उपस्थितीताना माहिती करून दिली. आपल्या घरादाराच्या किंवा परसदारात असंख्य पक्षी वावरत असतात.  मात्र आपल्याला या पक्षांची ओळख नसते आणि त्यामुळे अशा पक्षाचे महत्त्व आपल्याला समजत नाही वास्तविक पाहता सर्वच पक्षी एक समान मानतो पण पर्यावरणात  प्रत्येक पक्षाचे वेगळे स्थान आहे.  ते स्थान ढळू न देता त्याचे संवर्धन झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले. मानवी गरजा पूर्ण करीत असताना शाश्वत विकास झाला पाहिजे मात्र निसर्गाचा ऱ्हास करून विकास करणे याला शाश्वत विकास न समजता तो मानवी विनाशाची सुरुवात आहे असेही  प्रतिपादन केले.  तेव्हा सर्वांनी पर्यावरण आणि पक्षी-प्राणी मध्यवर्ती ठिकाणी ठेवून त्यांचे संवर्धन करण्याबरोबरच मानवी विकास साधता आला पाहिजे असे मत मांडले. अध्यक्षीय भाषणात प्र. प्राचार्य सुरेश भोसले यांनी सांगितले की, निसर्गात पक्षांकडून अनेक काही शिकण्यासारखे असते चिमणी सारखा साधा वाटणारा पक्षी सुद्धा अत्यंत हुशार आहे. पक्ष्यांची घरे बांधण्याची कला ही स्थापत्यशास्त्राला लाजवण्यासारखी असते. पक्षी कीटकांचा बंदोबस्त करतात व पर्यायाने मानवाच्या मूलभूत गरजांचे ते जतन करत असतात हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे व पक्षी प्राणी आणि पर्यावरणाचे जतन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे नियोजन प्राणीशास्त्र विभागातील प्रा. डॉ विजय यादव प्रा.अशांक भोसले आणि प्रा. कु. सीमा बिचुकले, प्रयोगशाळा परिचर श्री.प्रदीप आसबे यांनी केले. कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन प्रा.  प्रसाद लोखंडे यांनी केले तर प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजय गाडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमासाठी बीएससी भाग-दोन आणि बीएससी भाग-३ प्राणीशास्त्र विषयाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here