जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टेंभूच्या अधिकाऱ्यांना दिले आदेश
सांगोला (प्रतिनिधी): टेंभू योजनेतून सांगोला तालुक्यातील माण नदीला पाणी सोडावे आणि नदीवर असणारे सर्व बंधारे भरून द्यावेत या मागणीसाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नुकतीच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. यावर संबंधित विभागाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता रेड्डीयार यांनी टेंभू योजनेनेचे पाणी ५ मे च्या दरम्यान आटपाडी तलावातून माण नदीत सोडण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.
सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतातील पिके जतन करण्यासाठी आणि दरातील पशुधन जतन करण्यासाठी शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची चिंता भेडसावत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नुकतीच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती. गतवर्षी झालेल्या पावसाळ्यात अनियमित आणि अवेळी पाऊस झाल्याने चालू वर्षी उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. माण नदीच्या काठावर असलेल्या गावांना सध्या पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने शेतातील उभी पिके, फळबागा जळून चालल्या आहेत. तर, दारात उभा असणारी जनावरे चारा आणि पाण्याअभावी टाहो फोडत आहेत. दरवर्षी उन्हाळी आवर्तनात टेंभूचे पाणी मान नदीत सोडण्याची मागणी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मान्य केली असल्याचेही दिपकआबांनी आवर्जून स्पष्ट केले.
सांगोला तालुक्यातील शेतीला आणि जनावरांना जीवनदान देण्यासाठी माण नदीत टेंभूचे पाणी सोडणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. यावर मंत्री महोदयांनीही सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ टेंभूचे कार्यकारी अभियंता रेड्डीयार यांना आदेश दिले आहेत आणि रेड्डीयार यांनीही ५ मे च्या दरम्यान टेंभूचे पाणी आटपाडी तलावातून माण नदीत सोडून नदीवरील खवासपूर ते देवळे मेथवडे दरम्यान असणारे सर्व म्हणजे कोल्हापूर पद्धतीचे १५ बंधारे भरून देण्याचे आश्वासन दिल्याने सांगोला तालुक्यातील माण नदीकाठी असणारा शेतकरी आणि पशुपालकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक