पुष्पलता युवराज मिसाळ यांच्या “मौनामधला गंध” या पुस्तकाचे प्रकाशन
सांगोला ( प्रतिनिधी )- आज विचारवंतांची खरी गरज आहे, कारण समाजाला दिशा देणारी माणसं कमी होत चालली आहेत. वैचारिक वारसा जोपासायचा असेल तर लेखकांनी समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक डॉ.कृष्णा इंगोले यांनी केले.
पुष्पलता युवराज मिसाळ यांच्या “मौनामधला गंध” या जीवनासाठी सुंदर अशा विचारांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले सर यांच्या हस्ते बुधवारी सकाळी आपुलकी प्रतिष्ठान कार्यालय, सांगोला येथे संपन्न झाले. त्यावेळी डॉ. इंगोले बोलत होते. व्यासपीठावर लेखिका पुष्पलता मिसाळ, युवराज मिसाळ, दै.सांगोला वृत्तवेध चे संपादक सचिन भुसे, आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव आदी उपस्थित होते.
. डॉ. इंगोले पुढे बोलताना म्हणाले की, समाजामध्ये विचारवंतांची मोठी गरज असते. विचारवंत हे अँटेनासारखे असतात, समाजाच्या बदलाची दिशा पहिल्यांदा विचारवंतांच्या लक्षात येते आणि तो समाजाला वेळीच सावध करतो. “मौनामधला गंध” या पुस्तकाच्या लेखिका पुष्पलता मिसाळ या सांगोल्याच्या साहित्य क्षेत्रातील हिरकणी आहेत. त्यांचा साहित्याचा गाढा अभ्यास असून त्यांनी यापुढेही असेच लिखाण कायम करत राहावे अशी अपेक्षा डॉ. इंगोले यांनी यावेळी व्यक्त करत निष्ठेने व निरपेक्ष भावनेने गोरगरिबांसाठी आपुलकी प्रतिष्ठानचे उत्कृष्ट काम चालू आहे, सांगोल्यात अशा संस्था असणे हे सांगोल्याचे भाग्य असल्याचे सांगून डॉ. इंगोले यांनी आपुलकीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखिका पुष्पलता मिसाळ यांनी केले. लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानच्या जिव्हाळ्याच्या सहवासात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आत्मीयतेत हा प्रकाशन समारंभ माझ्यासाठी खूप अनमोल क्षण असून पुस्तकाचे प्रकाशन ही यजमानांकडून माझ्यासाठी मोठी भेट असल्याचे सांगत आपुलकी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यासाठी मिसाळ परिवाराच्या वतीने १५ हजार २५ रुपयाची देणगी दिली. यावेळी कवयित्री हर्षदा गुळमिरे, सुवर्णा तेली, सुशिला नांगरे- पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
. सूत्रसंचालन सुवर्णा इंगोले मॅडम यांनी केले.डॉ. राज मिसाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पोपटराव मिसाळ, सुरेश फुले, डॉ शिवराज भोसले, डॉ. मच्छिंद्र सोनलकर, सहाय्यक अभियंता विजय नागणे, अजय भोसले, वैभव जाधव, खडतरे मॅडम, वैष्णवी मिसाळ, तेजस मिसाळ व मिसाळ परिवारातील सदस्य, आपुलकी सदस्य व निमंत्रित उपस्थित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक