मारुती मंदिर सुशोभीकरण की आमदार निवासाचे सुशोभीकरण?
निविदा रद्द करण्याची मागणी
सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील मारुती मंदिर व परिसर सुशोभीकरणाची कामे यापूर्वी झाली असतानाही पुन्हा प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत मारुती मंदिर व परिसर सुशोभकरणाची १ कोटी ५५ लाख रुपये खर्चाची बोगस निविदा प्रसिद्ध झाली आहे. जनतेच्या पैशातून मारुती मंदिर परिसर सुशोभीकरण करावयाचे आहे की आमदार शहाजीबापू पाटील यांच्या निवासस्थानाचे सुशोभीकरण करावयाचे असा प्रश्न शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे तालुकाप्रमुख सुभाष भोसले, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष रवींद्र कदम, बाळासाहेब भोसले यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोट्यावधी रुपये हडपण्याचा लोकप्रतिनिधींचा डाव असून सदरची निविदा रद्द करावी अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील मारुती मंदिर व परिसर सुशोभीकरणासाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये प्रवेशद्वारासाठी ६६ लाख २९ हजार रुपये, अंतर्गत रस्त्यासाठी ५३ लाख २७ हजार रुपये, आरसीसी गटारसाठी १२ लाख १६ हजार रुपये, सभा मंडपासाठी २२ लाख ६३ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
वास्तविक चिकमहूद येथील मारुती मंदिर व परिसर सुशोभीकरणासाठी २०१९-२० ते २०२४ या कालावधीमध्ये तत्कालीन खासदारांच्या खासदार निधीतून मारुती मंदिर सभा मंडप उभारण्यासाठी दहा लाख रुपये, तसेच २५/१५ मधून सभामंडप बांधण्यासाठी वीस लाख रुपये असे एकूण सभा मंडपासाठी ३० लाख रुपये या अगोदरच खर्च करण्यात आले आहेत. त्यातून मारुती मंदिरासाठी सभामंडप उभारण्यात आला आहे. तर मारुती मंदिर परिसरामध्ये पेव्हर ब्लॉक जिल्हा परिषद अंतर्गत १५ लाख रुपये खर्चुन बसविण्यात आले आहेत. या परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी खोली बांधकामासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तर मुख्य चौकातील ग्रामपंचायतीच्या जागेत गाळे बांधकामासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये प्रमाणे ७० लाख रुपये खर्चुन गाळे बांधण्यात आलेले आहेत. शिवाय ग्रामपंचायत कार्यालयासाठी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातून २० लाख रुपये मंजूर आहेत. मारुती मंदिर परिसरातील ही सर्व कामे करण्यासाठी आत्तापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आली आहेत. असे असतानाही आमदार शहाजीबापू पाटील यांचे मूळ गाव असलेल्या चिकमहुद येथील मारुती मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी नव्याने दोन कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. तांत्रिक बाबींना मंजुरी देऊन संबंधित ठेकेदारास पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अ.ता. निमकर यांनी कार्यारंभ आदेशही दिला आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या करातून मिळालेले कोट्यावधी रुपये हडपण्याचा डाव असल्याने सदरची निविदा रद्द करण्यात यावी अशी मागणी चिकमहूद येथील ग्रामस्थांनी सांगोला येथील सार्वजनिक – बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे
अशाप्रकारे झालेली कामे पुन्हा दाखवून जनतेचा पैसा हडपला जात आहे. येथील लोकप्रतिनिधी पाच हजार कोटी निधी आणला म्हणत आहेत. असा निधी हडपून हजार कोटी निधी घरातच गेला असेल. यात अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा खेळ केला जात आहे. संबंधित दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे व प्रसिद्ध झालेली निविदा रद्द करण्यात यावी.
सुभाष भोसले, तालुकाप्रमुख, युवासेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक