सांगोला (प्रतिनिधी) – आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर अंबिकादेवी यात्रा समितीच्या संयुक्त विद्यमाने झोपडपट्टीतील गरीब मुले व त्यांच्या कुटुंबियांना यात्रेचा आनंद द्विगुणित करणाऱ्या पाळण्याचा आनंद देऊन नंतर खाऊ देवून यात्रेची सफर घडविण्यात आली.

आपुलकी प्रतिष्ठान सांगोलाच्या वतीने गेल्यावर्षीपासून हा उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षी सांगोला शहरातील मिरज रोडलगत असलेल्या लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील गरीब मुले व त्यांच्या पालकांना यात्रेत ंबोलावून मोठा पाळणा, जहाज आदी विविध खेळण्यांमध्ये बसवून यात्रेचा आनंद देण्यात आला. त्याचबरोबर सांगोला यात्रेत सर्वांच्या पसंदीस उतरणारी गरम जिलेबी व भजी देवून यात्रेचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

यात्रेतील पाळण्यात बसल्यानंतर या गोरगरिब मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्व काही सांगून जाणारा असा होता. पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर भटकंती करुन मिळेल त्यात समाधान मानणारी ही भटकी कुटुंबे आपल्या प्रपंचाचा गाडा ओढताना होणारी दमछाक कोणाला सांगणार? अशा परिस्थितीत यात्रेचा आनंद मुलांना मिळणे तसे दुर्मिळच. याचा विचार करुनच आपुलकी प्रतिष्ठान या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेने गेल्यावर्षीपासून अशा गरीब मुलांना यात्रेची सफर घडवून आणण्याचा एक आनंददायी उपक्रम सुरु केला आहे.

यावर्षी कोर्ट रिसिव्हर ॲड. सारंग वांगीकर, ॲड. विक्रांत बनकर, ॲड. विशालदीप बाबर, ॲड. नितीन बाबर, ॲड. शशिकला खाडे, ॲड. महेंद्र पतकी व पाळण्याचे मालक प्रदीप इंगोले (वाढेगाव) यांच्या सहकार्याने लक्ष्मीनगर भागातील गोरगरीब मुलांना यात्रा दर्शन घडविण्यात आले. यावेळी आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, वसंत माने, महादेव दिवटे, अरविंद डोंबे गुरुजी, अतुल वाघमोडे आदीसह कोर्ट रिसिव्हर उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


