वासुदचे सुपुत्र डॉ. निरंजन केदार यांचा ‘जीवन-संजीवन’ पुरस्काराने गौरव

0

सांगोला (प्रतिनिधी):सांगोला तालुक्यातील वासुद-अकोला या गावचे सुपुत्र आणि निष्णात फिजिशियन डॉ. निरंजन आनंदराव केदार (MD Medicine) यांना त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल सी.बी.एस. न्यूज मराठी यांच्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात ‘जीवन-संजीवन पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून नवजीवन देणाऱ्या डॉ. केदार यांना पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हलाखीच्या परिस्थितीतून यशाचे शिखर

डॉ. निरंजन केदार यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचे वडील श्री. आनंदराव गणपती केदार यांनी रयत शिक्षण संस्थेत ग्रंथपाल म्हणून काम करताना, घराच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. वडिलांचे कष्ट आणि प्रामाणिकपणा या संस्कारांच्या शिदोरीवर डॉ. निरंजन यांनी बालवाडी ते सातवीपर्यंतचे शिक्षण कराड येथे, तर दहावीपर्यंतचे शिक्षण पंढरपूरच्या यशवंत विद्यालयात अव्वल क्रमांकाने पूर्ण केले. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून बारावीची गुणवत्ता मिळवून त्यांनी शासकीय कोट्यातून वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग मोकळा केला.

रयतचे संस्कार आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व

डॉ. केदार यांच्या व्यक्तिमत्त्वावर कर्मवीर अण्णांच्या विचारांचा मोठा पगडा आहे. साताऱ्याच्या आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला, ज्याची दखल घेत त्यांना ‘आदर्श विद्यार्थी’ पुरस्काराने गौरवण्यात आले. पुढे बेळगावच्या नामांकित के.एल.ई. विद्यापीठातून एम.डी. करताना त्यांनी परराज्यातही आपली मोहोर उमटवत ‘सर्वोत्कृष्ट पदव्युत्तर विद्यार्थी’ हा बहुमान पटकावला.

‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’

गेल्या ४-५ वर्षांपासून डॉ. केदार सांगोला तालुक्यात केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता माणुसकीच्या भावनेतून वैद्यकीय सेवा देत आहेत.शासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना उच्च दर्जाचे उपचार मोफत मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र धडपडत असतात.मोफत तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि आरोग्य जनजागृतीच्या माध्यमातून त्यांनी ‘संवेदनशील डॉक्टर’ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.त्यांचे अनेक शोधनिबंध (Research Papers) Pubmed आणि Scopus सारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

खेळाच्या मैदानातून राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप

डॉ. केदार हे केवळ स्टेथोस्कोपपुरते मर्यादित नसून, ते एक यशस्वी खेळाडू देखील आहेत. कबड्डी आणि शरीरसौष्ठव (Bodybuilding) या खेळांमध्ये त्यांनी आंतरराज्य आणि ऑल इंडिया आंतरविद्यापीठ स्तरावर मैदान गाजवले आहे. सध्या ते ‘इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन’ चे राष्ट्रीय पंच म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. केदार हे सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात सक्रिय आहेत. आबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपत त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. अशा सुशिक्षित आणि संवेदनशील तरुणांनी समाजकारणात सक्रिय होणे ही काळाची गरज असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे.

 “डॉ. निरंजन केदार यांनी आपल्या वडिलांच्या कष्टातून आणि कर्मवीरांच्या विचारातून प्रेरणा घेत समाजाची सेवा केली आहे. ‘जीवन-संजीवन’ हा पुरस्कार त्यांच्या आजवरच्या निस्पृह रुग्णसेवेची पावतीच आहे.”

डॉ. निरंजन केदार यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस ‘रयत’ परिवार आणि सांगोला तालुक्यातील जनतेने मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here