सभापती, उपसभापती निवडीचा बिगुल वाजला; १२ मार्चला फैसला!
सांगोला (प्रतिनिधी): तालुक्यातील राजकीय वातावरणात सध्या कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. सांगोला पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीचा अधिकृत कार्यक्रम जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केला असून, ही निवड प्रक्रिया गुरुवार, दिनांक १२ मार्च २०२६ रोजी पार पडणार आहे.

निवडणूक प्रक्रियेसाठी अध्यासी अधिकारी म्हणून मंगळवेढा विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. भैरप्पा माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच दिवशी नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींची नावे स्पष्ट होतील.
नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सांगोला तालुक्यात धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. आ. बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘सांगोला तालुका विकास आघाडी’ने ९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. शिवसेना आणि भाजप महायुतीला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

आकडेवारीनुसार सांगोला तालुका विकास आघाडीचे पारडे जड असले, तरी सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या एका वक्तव्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. “जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांवर भाजपचाच झेंडा फडकेल,” असे सूचक विधान नामदार गोरे यांनी केल्याने सांगोल्यात काही ‘राजकीय चमत्कार’ किंवा फोडाफोडीचे राजकारण होणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

नऊ विरुद्ध पाच अशा फरकामुळे सांगोला तालुका विकास आघाडी निश्चिंत असली तरी, ऐनवेळी महायुतीकडून कोणती खेळी खेळली जाते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि सांगोल्याचा ‘किल्ला’ कोण राखणार, याचा निकाल १२ मार्चला लागणार आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



