सांगोला (प्रतिनिधी): सांगोला–पंढरपूर मार्गावर पुलाजवळ झालेल्या दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा सांगोला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, फिर्यादीचा स्वतःचा ड्रायव्हरच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली थार गाडी आणि मुद्देमाल जप्त केला आहे.

२१ मार्च २०२६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास, कोल्हापूर येथील फिर्यादी दिलीप भागोजी पाटील हे त्यांच्या वाहनाने जात असताना विना नंबरच्या काळ्या थार गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांना अडवले. “गाडीला कट का मारला?” असा बहाणा करून आरोपींनी हुज्जत घातली आणि पाटील यांना दमदाटी केली. त्यानंतर आरोपींनी गाडीच्या डिकीतील बॅगेतून २ लाख ५० हजार रुपये रोकड, दोन मोबाईल फोन आणि महत्त्वाची कागदपत्रे (आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम) जबरदस्तीने चोरून नेले होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यात वापरलेली थार गाडी कोल्हापूरची असल्याचे समजले. कोल्हापुरातून गौशपाक उर्फ मुन्ना अब्दुलरजाक जमादार याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

अधिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. फिर्यादीचा विश्वासू ड्रायव्हर रामचंद्र बापू साळुंखे यानेच पैशांच्या लालसेपोटी आपल्या साथीदारांच्या मदतीने हा दरोड्याचा कट रचला होता. या प्रकरणी रामचंद्र साळुंखे, संदीप बाबासो मेडगुळे आणि महेश मारुती कांबळे यांनाही अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना २६ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पीआय विनोद घुगे, पीएसआय चंद्रकांत पुजारी, पीएसआय सागर पाटील पोलीस कॉ. मच्छिंद्र राजगे, दत्ता वजाळे, अस्लम काझी, तसेच पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे, अमर पाटील आणि सायबर पोलीस ठाण्याचे राहुल सोनकर यांकर्मचाऱ्यांचा समावेश होता.सांगोला पोलिसांनी गुन्ह्यांचा अवघ्या २४ तासांत छडा लावल्यामुळे तालुक्यात पोलिसांच्या कार्यक्षमतेचे मोठे कौतुक होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



