सांगोला (प्रतिनिधी):सांगोला नगरपरिषदेची आर्थिक वर्ष २०२५-२६ ची वसुली मोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे. ३१ मार्चची मुदत जवळ येत असल्याने नगरपरिषदेने थकबाकीदारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून, कर न भरणाऱ्यांचे नळ कनेक्शन खंडित करणे आणि गाळे सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी सर्व नागरिकांना ३१ मार्चपूर्वी आपला संपूर्ण कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

नगरपरिषदेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मालमत्ता कर ३ कोटी ३१ लक्ष वसुल झाला असून ३ कोटी २२ लक्ष वसुल होणे बाकी आहे. पाणीपट्टी कर १६८.३५ लक्ष (१.६८ कोटी) वसुल झाला असून १ कोटी १६ लक्ष वसुल होणे बाकी आहे. तसेच गाळा भाडे कर ६२ लक्ष वसुल झाला आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर जप्ती आणि नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम राबवली जात आहे. जे गाळेधारक वारंवार सूचना देऊनही भाडे भरत नाहीत, त्यांचे गाळे नगरपरिषदेमार्फत सील करण्यात येत आहेत. तसेच, मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकवणाऱ्या नागरिकांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

“शहराच्या विकासकामांसाठी आणि नागरी सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी वेळेवर कर भरणे आवश्यक आहे. ३१ मार्च ही अंतिम मुदत असून, कटू कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी तातडीने आपल्या कराचा भरणा करावा.” — डॉ. सुधीर गवळी (मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद)

ज्या नागरिकांनी अद्याप आपला मालमत्ता कर, पाणीपट्टी किंवा गाळा भाडे भरलेले नाही, त्यांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी नगरपरिषदेच्या कर संकलन केंद्रावर जाऊन आपली थकबाकी जमा करावी आणि होणारी दंडात्मक कारवाई टाळावी.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



