सांगोला (प्रतिनिधी) : शहरातील आठवडा बाजार सुरळीत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी सांगोले नगरपरिषदेकडून महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन करण्यात आले आहे. रविवारी आठवडा बाजार दिवशी शेतकरी व व्यापारी भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्यावरती भाजीपाला विक्री करू नये, असे स्पष्ट निर्देश नगरपरिषदेमार्फत देण्यात आले आहेत.

नगरपरिषद प्रशासनाने सांगितले की, आठवडा बाजार आवारात पत्राशेड व परिसरामध्ये भरपूर जागा उपलब्ध असून सर्व विक्रेत्यांसाठी तेथे बसण्याची योग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही विक्रेत्यांनी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी बसून विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांशी कोणत्याही प्रकारचा वाद-विवाद किंवा हुज्जत घालू नये, असेही नागरिकांना व विक्रेत्यांना बजावण्यात आले आहे. आठवडा बाजार आवारामध्ये दुचाकी व चारचाकी वाहने आतमध्ये घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची वाहने पोलीस स्टेशनला जमा करण्यात येतील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

याशिवाय भीमनगरसमोरील रस्त्यावर कोणत्याही व्यापाऱ्याने बसू नये, कारण सदरची जागा दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग म्हणून वापरण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रविवारी आठवडा बाजार याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. तसेच रस्त्यावर भाजीपाला, फळविक्रेते बसत असून त्याठिकाणी गाडी पार्किंगलाही अडथळा निर्माण होत आहे.

नगरपरिषद प्रशासनाने सर्व नागरिक, शेतकरी व व्यापाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. आनंदा गोरख माने व मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



