वाढेगाव (प्रतिनिधी): माणगंगा भ्रमणसेवा संस्था वाढेगाव व श्री बृहत भारत समाज सेवा संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तसेच मेडशिंगी व वाढेगावचे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने लोकसहभागातून सन २०२५ मध्ये ‘जागतिक जलसंवर्धन पंधरवड्यानिमित्त’ निमित्त अप्रुका नदीवरील सिमेंट बंधाऱ्यावर पंचशतावरी जलसंवर्धन प्रकल्प राबवला होता. या प्रकल्पामुळे प्रकल्प पासून २०० फूट अंतरावर दादासाहेब सोनलकर यांचे शेतात पाषाणात असणाऱ्या ८० फूट खोलीच्या व ३० फूट व्यासाच्या पाच वर्षापासून कोरड्या असलेल्या पाषाणातून अखंड पाण्याचा प्रवाह सुरू झाला असून विहिरीच्या निर्मितीपासून कोरड्या असणाऱ्या विहिरीत स्वच्छ भरलेले पाणी पाहून शेतकऱ्यातून या पंचशतावरी प्रकल्पाचे कौतुक होत आहे.

या प्रकल्पामुळे परिसरात असणाऱ्या पाच ते सहा विहिरीच्या पाणीसाठ्यात चांगल्या पद्धतीने वाढ झालेली आहे. सन २०२५ मध्ये जलसंवर्धन पंधरवड्यानिमित्त माणगंगा भ्रमणसेवा संस्थेने एक नाविन्यपूर्ण नवीन प्रयोग हाती घेऊन अप्रुका नदीवर जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांच्या सहयोगातून बांधलेल्या सिमेंट नाल्याच्या पाणीसाठाक्षेत्रात शंभर-शंभर फूट खोलीचे बोरिंग मशीनच्या साह्याने पाच कुपनलिका खोदून त्यामध्ये सात-आठ फूट उंचीच्या जमिनीच्या पृष्ठभागावर दोन ते अडीच फूट उंच राहतील, अशा केसिंग पाईप लावल्या. त्या पाईपला छोटी छिद्रे पाडून त्यामध्ये खडे, गाळ जाऊ नये म्हणून पाईपला वायरचे कापड गुंडाळले तसेच पाईपच्या वरील तोंडावर झाकण लावून त्या झाकणाला छिद्रे पाडून त्यावर वायरचे कापड गुंडाळले.

नंतर पाईप भोवती पाच फूट लांब, पाच फूट रुंद व पाच फूट खोलीचे खड्डे घेऊन ते खड्डे छोटी खडी, मध्यम खडी व दगड असे थर देऊन खड्डे बुजवण्यात आले. मे २०२५ मध्ये पाऊस होऊन सिमेंट बंधाऱ्यात साठलेले पाणी त्या पाचही होल मधून शंभर फूट भूगर्भात जाऊन पाझराद्वारे परिसरात गेले. व आसपासच्या विहिरीच्या पाणी साठ्यात वाढ झाली तर ८० फूट खोलीची मोठी विहीर पाडल्यापासून एक मुशी पाषाण दगड लागल्याने विहिरीत एक थेंबही पाणी येत नव्हते. परंतु सिमेंट बंधाऱ्यात पंचशतावरी प्रकल्प राबवल्यामुळे पाझराद्वारे मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाणी विहिरीत साठत असल्याचे शेतकरी दादासाहेब सोनलकर यांनी सांगितले. या कामासाठी तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव व पंढरपूरचे डॉ. आनंद भिंगे, डॉ. मच्छिंद्र सोनलकर, सुहास बाजारे इ. चे सहकार्य लाभले.

संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील माण नदी पात्र स्वच्छ केले असले तरी त्यामध्ये काही प्रमाणात पाणी टिकले तर वृक्षवेली, पशुपक्षी यांचे अस्तित्व राहील व त्याचा पर्यावरणाला उपयोग होईल. म्हणून नदीला मिळणाऱ्या ओढ्यामधील पाणी भूगर्भात जिरवले तर ते पाणी नदीपात्राकडे येईल. या हेतूने आमच्या संस्थेने जलसंधारणाचे नवीन अभियान राबवले व त्याचे सकारात्मक परिणाम दिसल्यामुळे या वर्षात दोन ठिकाणी सिमेंट बंधाऱ्यांमध्ये असेच प्रयोग राबवणार असल्याचे माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांनी सांगितले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



