सांगोला विद्यामंदिरमध्ये तब्बल ८९ माजी सैनिकांना कृतज्ञतेचा पवित्र धागा बांधून सैनिक रक्षाबंधन

0

सां.ता.शि.प्र.मंडळ व सांगोला विद्यामंदिर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रभक्तीचा अनोखा जागर

 सांगोला (प्रतिनिधी):बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाचे आणि भावाने घेतलेल्या तिच्या रक्षणाच्या जबाबदारीचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन याच भावनिक विणला प्रमाण मानून, देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व सांगोला विद्यामंदिर अमृत महोत्सवी वर्ष २०२६-२७ निमित्त ‘सैनिक रक्षाबंधन व शौर्य सन्मान’ हा अत्यंत भावनिक व अनोखा उपक्रम सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे राबवण्यात आला.

​यावेळी व्यासपीठावर भारतीय माजी सैनिक संघटना सोलापूर अध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे, संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, प्राचार्य चारुदत्त जगताप,ड्रीम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी,करांडे इंटरनॅशनल स्कूलचे श्रीधर करांडे,माजी सैनिक कल्याणकारी संघटना सांगोला अध्यक्ष रावसाहेब साळुंखे,जय जवान माजी सैनिक सेवाभाव संस्था सांगोला अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील,उपाध्यक्ष रविकांत मराळ,तसेच चिणके, राजापूर, सोनंद जवळा, मानेगाव, मंगळवेढा, वासुद, अकोला, कडलास मानेगाव बुद्रुक, कोळा आदि गावातील माजी सैनिक संघटना अध्यक्ष उपस्थित होते.

​जिल्ह्यात पहिल्यांदाच संपन्न झालेल्या या भव्य सन्मान सोहळ्याच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,थोर स्वातंत्र्यसेनानी,देशभक्त कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या एनसीसी कॅडेटने माजी सैनिकांना मानवंदना दिली.

​ संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी प्रास्ताविकात थोर स्वातंत्र्यसेनानी बापूसाहेबांचे तत्त्वनिष्ठ विचार आणि त्यांच्या अतीव राष्ट्रभक्तीचा विचार पुढच्या पिढीतही रुजावा आणि मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी,याच उदात्त हेतूने संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगत कार्यक्रमाचा हेतू विषद केला व उपस्थितांचे स्वागत केले

​याप्रसंगी ड्रीम फाउंडेशन सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ भतगुणकी यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना माजी सैनिकांकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. देशासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या सैनिकांविषयी कायम आदरभाव ठेवा असे सांगितले. तसेच भारतीय माजी सैनिक संघटना सोलापूरचे अध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे यांनी जवान, शेतकरी आणि शिक्षक हे देशाच्या जडणघडणीचे महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असल्याचे सांगितले. देशाला संरक्षण दृष्ट्या बलशाही करण्यासाठी सैनिक कार्य करत असतात, त्यामुळे सैनिकांविषयी आणि जन्म देणाऱ्या आई-वडिलांविषयी नेहमी आदर बाळगा, मोबाईलपासून दूर राहा आणि वाचन संस्कृती वाढवा, असा मोलाचा विचार त्यांनी दिला व आयोजनाबद्दल संस्थेचे भरभरून कौतुक केले.

​या भावनिक सोहळ्यासाठी माजी सैनिक,संस्थेचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या राष्ट्रभक्तीने भारावलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनाजी चव्हाण यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्राचार्य चारूदत्त जगताप यांनी मानले.

​सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ सैनिकांना सन्मानित करण्याचा संस्थेचा संकल्प होता. मात्र, या उपक्रमाला साद देत तब्बल ८९ माजी सैनिक या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. सीमेवर ऊन-पावसाची तमा न बाळगता रक्षण करणाऱ्या या शूरवीर भावांच्या मनगटावर जेव्हा सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी कृतज्ञतेची राखी बांधली आणि सन्मानचिन्ह दिले, तेव्हा संपूर्ण सभागृह भारावून गेले. या वीर जवानांनीही बहिणीच्या नात्याने सर्व विद्यार्थिनींना शालेय साहित्याची भेटवस्तू देऊन त्यांच्या पाठीवर वात्सल्याची थाप दिली. डोळ्यांच्या कडा ओलावणारा आणि देशाच्या खऱ्या अनमोल हिऱ्यांचा गौरव करणारा हा प्रसंग सर्वांच्याच कायम स्मरणात राहणारा ठरला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here