शिक्षक समितीच्या वतीने सांगोला येथे शिक्षण हक्क परिषद शिक्षणतज्ज्ञ भाऊ चासकर यांची लाभणार उपस्थिती !

0

सांगोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने रविवार दि. 6 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 1 वाजता शिक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ भाऊ चासकर (अकोले ) यांची प्रमुख उपस्थिती आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पुणे विभागातील संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी सकाळी 10 ते 1 यावेळेत कार्यकर्ता उदबोधन शिबिर मुक्ताई लॉन्स, कडलास रोड, सांगोला येथे आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत शिक्षक समितीचे राज्यनेते उदयराव शिंदे (सातारा), राज्याध्यक्ष विजय कोंबे (वर्धा), महासचिव राजन कोरगांवक (सिंधुदुर्ग ) राज्य महिला आघाडी प्रमुख वर्षाताई केनवडे, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत (सोलापूर )आनंदा कांदळकर (नाशिक),विलास कंटेकुरे (धाराशिव ) कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील (सांगली ) कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर( पुणे ) विभागीय अध्यक्ष अर्जुन पाटील ( कोल्हापूर ) यांच्यासह राज्यभरातील शिक्षक समितीचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
याशिवाय दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या विदारक स्थितीवर चिंतन व्हावे या उद्देशाने दुपारी 1 वाजता शिक्षण हक्क परिषद आयोजित करण्यात आली असून ही परिषद सर्वांसाठी खुली आहे. या परिषदेचे उदघाट्न आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते व माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून महाराष्ट्रातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ भाऊ चासकर (अकोले ) हे “शिक्षण हक्काचं काय झालं? ” या विषयावर व्याख्यान देणार आहेत, शिवाय प्रचलित टीईटी परीक्षेमध्ये कोणते संरचनात्मक बदल करून सेवेतील शिक्षकांना न्याय देता येईल या अनुषंगाने आपली भूमिका मांडणार आहेत.

त्याचबरोबर शिक्षक समितीचे माजी राज्य संपर्कप्रमुख सुरेश पवार यांच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेल्या ” चक्रव्यूहात शिक्षण” या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी शिक्षण समिती सभापती चेतनसिंह केदार, सभापती सौ.पुनमताई इंगवले, उपसभापती मा.अजय सरगर यांच्यासह नुतन सांगोला तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार करण्यात येणार आहे.


तसेच कार्यक्रमासाठी शिक्षक नेते अनिल कादे, आटपाडीचे नगराध्यक्ष यु. टी. जाधव यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते पत्रकार,पालक सभा व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित राहणार आहेत. तरी या शिक्षण परिषदेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा तसेच सांगोला तालुका शाखेतील शिक्षक समितीचे सर्व आजी – माजी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
सदर कार्यक्रमसाठी पुणे विभागातील,सोलापूर जिल्ह्यातील व सांगोला तालुक्यातील शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सांगोला तालुक्याचे अध्यक्ष आबासाहेब पांढरे व सरचिटणीस दत्तात्रय शिंदे सर यांनी केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here