भारताच्या उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे दिल्लीमध्ये निधन झालं आहे.
भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या अखेरचा श्वास घेतला. त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी एम्स रुग्णालयात दिग्गज डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. यावेळी मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली. डॉक्टरांनी लगेच मनमोहन सिंह यांच्यावर उपचार सुरु केले. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं. पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तेव्हाच समोर आली होती. यानंतर काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार प्रियंका गांधी या एम्स रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली. यानंतर आता मनमोहन सिंह यांचं निधन झाल्याची दुर्देवी बातमी समोर आली आहे. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. आता त्यांचं निधन झालं आहे. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली.
सन 2004 साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ.मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले. 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही. त्यानंतर 2009 साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक