भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षपदाची दुसऱ्यांदा संधी मिळाली – पालकमंत्री ना. जयकुमार गोरे

0

भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचा सांगोल्यात भव्य सत्कार संपन्न

सांगोला (प्रतिनिधी): विरोधी पक्षातील आमदारांना किती अधिकार आहेत हे माहित नाही, पण राम सातपुते आणि राजाभाऊ राऊत यांना फुल्ल अधिकार आहेत. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकानंतरआता कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज होण्यासाठी त्यांना संधी देऊन त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कदर करणारा, पक्षाने दिलेला अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवणारा, निष्ठावान सच्चा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या चेतनसिंह केदार सावंत यांच्यावर दुसऱ्यांदा भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे असे मत ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

भाजपच्या सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्षपदी चेतनसिंह केदार सावंत यांची फेरनिवड झाल्यानंतर सांगोल्यात भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्राताई वाघ, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, माजी आमदार रामभाऊ सातपुते, माजी आमदार राजाभाऊ राऊत, सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, सोलापूरचे ग्रामीण पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सुजाताताई केदार सावंत, दुर्योधन हिप्परकर, माऊली हळणवर, संभाजी आलदर, बाळासाहेब एरंडे, मारुती बनकर, सचिन देशमुख, बाळासाहेब काटकर, विजय येलपले, गुंडादादा खटकाळे, संतोष देवकते यांच्यासह भाजपचे मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, मला लहानपणापासूनच विठुरायाच्या पालखीबद्दल आकर्षण आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने विठुरायाच्या नगरीचा आणि सिद्धरामेश्वराच्या नगरीचा पालकमंत्री होण्याची संधी मिळाली. श्री विठ्ठलाच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी धडपडत होतो, त्या पालखीचं नियोजन करण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची वेळ आली आहे. यापुढील काळात भाजपाचा कार्यकर्ता जिल्ह्यात स्वाभिमानाने आणि सनमानने काम करेल असे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी सांगितले.

 

माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर म्हणाले, निवडणुकीत यश अपयश हातात नसते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अटीतटीची लढाई झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रक्ताचे पाणी करून निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. पाण्याचे प्रश्न मार्गी लागले आहेत. विकासकामे हे भांडवल असल्याने रुसवे फुगवे बाजूला ठेवून काम करावे. पदासाठी निवडणूक न लढवता पक्षासाठी काम करावे. हेवेदावे पक्षासाठी घातक असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार राम सातपुते म्हणाले, चेतनसिंह केदार सावंत हा सर्वांना सोबत घेऊन काम करणारा धडाडीचा कार्यकर्ता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले जाईल. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्राताई वाघ यांनी पश्चिम जिल्ह्याचे पालकत्व घ्यावे असे आवाहन राम सातपुते यांनी केले.

 

माजी आमदार राजाभाऊ राऊत म्हणाले की, जिल्हाध्यक्ष म्हणून चेतनसिंह केदार सावंत यांनी पश्चिम जिल्ह्यात चांगली जबाबदारी पार पाडली आहे. भाजप सभासद नोंदणी कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी बार्शी तालुक्यात आठवड्यात दोनवेळा बैठका घेऊन ७० हजार सभासदांची नोंदणी केली. भाजपचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपने जिल्हाध्यक्ष पदाची पुन्हा एकदा संधी दिल्याचे त्यांनी सांगितले.

 

भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावरच भाजप संघटन मजबूत करण्यावर भर दिला. अंत्योदय संकल्पना डोळ्यासमोर ठेवून काम केले. माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी पाच वर्षाच्या काळात मतदारसंघाचा पाण्याचा प्रश्न सोडविला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मातृशक्तीला ऑपरेशन सिंदूर समर्पित केलं – आ. चित्रा वाघ 

माझ्याकडे सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुक अधिकाऱ्याची जबाबदारी सोपवली होती. त्यावेळी सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला. सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्षपदी चेतनसिंह केदार सावंत यांची निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ला करून निरपरथ लोकांचा जीव घेतला, देशातील भगिनींचे कुंकू पुसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मातृशक्तीला ऑपरेशन सिंदूर समर्पित केलं. आणि या देशातील प्रत्येक महिलांचं मनोबल वाढवण्याचे काम केलं. देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक घटकाला न्याय दिला आहे. खासदार रणजीतसिंह निंबाळकर, राम सातपुते, राजाभाऊ राऊत यांच्या पराभवाचे शल्य आजही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याने प्रत्येकाने पक्ष वाढीसाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन आमदार चित्रा वाघ यांनी केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here