सोलापुरातील गिर्यारोहकांची टीम, १५ ऑगस्ट २०२५ रोजी माउंट शिनकून सर करून “स्वराज्य तोरण” फडकावणार

0

भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीचं अनोखं आणि प्रेरणादायी दर्शन घडवण्यासाठी सोलापुरातील गिर्यारोहकांची एक टीम हिमालयातील माउंट शिनकुन (६०८० मीटर) या शिखराच्या मोहिमेवर निघाली आहे.

टीम ८ ऑगस्ट ला मुंबई _ दिल्ली_ मनाली असा प्रवास करतील आणि १५ ऑगस्ट, २०२५ रोजी स्वराज्य तोरण आणि तिरंगा फडकावून भारताचा स्वतंत्रता दिवस साजरा करून १६ ऑगस्ट रोजी परतीचा प्रवास करतील.

आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक वैभव पांडुरंग ऐवळे आणि टीमने १५ ऑगस्ट २०२५ रोजी हिमालयातील अत्यंत अवघड आणि कमी ओळखल्या जाणाऱ्या माउंट शिनकून (Mount Shinkun – 6080 मीटर) या शिखरावर भारतीय तिरंगा आणि “स्वराज्य तोरण” फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा संकल्प केला आहे.

🏔️माउंट शिकुन विषयी थोडी माहिती – एक रोमांचकारी हिमालयीन शिखर आहे. हिमाचल प्रदेश आणि लडाखच्या सीमेवर, लाहौल-स्पीती आणि झंस्कार पर्वतरांगेतल्या शिनकून ला पास जवळ वसलेले एक अत्यंत अवघड व दुर्गम शिखर आहे. याची उंची ६०८० मीटर असून, याची चढाई अजूनही अत्यंत थोड्या गिर्यारोहकांनी पूर्ण केली आहे.

शिंकुन ला पास हा प्राचीन झंस्कार–लाहौल मार्गावरचा उच्च हिमालयीन दर्रा आहे. येथील परिसर तुलनेने “अनएक्सप्लोर्ड” मानला जातो. ट्रेकची सुरुवात दारचा (Darcha) गावापासून होते आणि उंची वाढताना प्रचंड बर्फ, विरळ ऑक्सिजन, आणि बदलते हवामान ही मोठी आव्हाने असतात.

शिखर सर करताना येणारी आव्हाने आणि हवामान:

तापमान -१०°C ते -२५°C दरम्यान असते. हवामान अनिश्चित आणि अचानक बदलणारे. ऑक्सिजनची कमतरता आणि अल्टिट्यूड सिकनेसची शक्यता असते. उभी बर्फाची चढाई, हिमखंड, आणि ग्लेशियर क्रॉसिंगचा धोका आहे. अशा आव्हानं यांचा सामना करत ते हे शिखर सर करण्याचा निर्धार केला आहे.

म्हणूनच, माऊंट शिनकून च्या चढाईसाठी उत्कृष्ट शारीरिक क्षमता, अनुभवी मार्गदर्शन, आणि मानसिक ताकदीची अत्यंत गरज आहे. टीम मध्ये सोलापूरचे डॉ. सुनील खट्टे, डॉ. निशिकांत कळाल, अॅड. बाळकृष्ण जाधव, इंजिनिअर निखिल यादव आणि वैभव पांडुरंग ऐवळे यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याचा गौरव या मोहिमेत अभिमानाने साजरा केला जाणार आहे. या १२ किल्ल्यांचे प्रतीक म्हणून, एक विशेष ‘किल्ल्यांचं ध्वजतोरण’ देखील शिखरावर फडकावण्यात येणार आहे.

“स्वराज्य तोरण”– ऐतिहासिक गडांची गौरवगाथा

माऊंट शिनकुन च्या शिखरावर फडकवले जाणारे “स्वराज्य तोरण” हे एक विशेष ध्वजतोरण असून, यामध्ये UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ दुर्ग समाविष्ट आहेत:

रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, आणि जिंजी (तामिळनाडू).

आधीचे प्रेरणादायी उपक्रम:

वैभव ऐवळे आणि त्यांच्या टीमने २०१८ पासून दरवर्षी स्वतंत्रता दिन विविध खंडांतील सर्वोच्च शिखरे सर करून साजरा केला आहे:

२०१८ – माउंट किलीमांजारो, आफ्रिका (५८९५ मी) – ७२ ध्वज

२०१९ – माउंट एल्ब्रस, युरोप (५६४२ मी) – ७३ ध्वज

२०२० – (लॉक डाऊन)

२०२१ – माउंट कांग येतसे २ (६२५० मी)

२०२२ – माउंट जो जॅगो (६२८० मी)

२०२३ – माउंट उटी काँग्री (६०७० मी)

२०२४ – माउंट युनाम (६१११ मी)

सामाजिक बांधिलकी:

वैभव ऐवळे हे केवळ गिर्यारोहकच नव्हे तर समाजप्रेमी कार्यकर्तेही आहेत. त्यांनी “अवयव दान जनजागृती”, “ती आणि तिचे चार दिवस”, पर्यावरण रक्षण अशा विविध सामाजिक चळवळींमध्ये पुढाकार घेतला आहे.

वैभव आणि टीमच्या कार्याची दखल घेत ज्येष्ठ समाजसेवक श्री. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांच्या कडून हेमलकसा येथे टीमचा सत्कार करण्यात आले आहे. त्यांच्या नावाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, इंडिया बुक आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे.

देशभक्ती आणि प्रेरणा:

माऊंट शिनकुन या विक्रमी उंच शिखरावर “स्वराज्य तोरण” फडकावून भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करणे हा उपक्रम केवळ साहस नसून, देशप्रेम, इतिहासगौरव आणि सामाजिक जागरूकतेचा संगम आहे.

ही मोहीम फक्त गिर्यारोहण नव्हे, तर समाजप्रबोधन आणि युवा पिढीला प्रेरणा देणारी आहे. स्वातंत्र्यदिनाचा अर्थ केवळ उत्सव साजरा करणे नाही, तर देशासाठी काहीतरी भव्य, दिव्य आणि प्रेरणादायी करणं, हे या टीमने पुन्हा सिद्ध केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here