सांगोल्यात चक्क बोर्डाची ‘स्ट्राँग रूम’ फोडली; दहावीच्या भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरीला

0

सांगोला (प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा सुरू असतानाच सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर येथील परीक्षा केंद्राची ‘स्ट्राँग रूम’ फोडून अज्ञात चोरट्यांनी उद्या (१८ मार्च) होणाऱ्या भूगोलाच्या तब्बल ५० प्रश्नपत्रिकांचा संच लंपास केला आहे. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, परीक्षेच्या गोपनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, उद्या होणाऱ्या भूगोलाच्या पेपरसाठीच्या प्रश्नपत्रिका सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ‘स्ट्राँग रूम’मध्ये ठेवण्यात आल्या होत्या. आज सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास शिक्षण विभागाचे अधिकारी आणि कस्तोडियन कालचे (शुक्रवारचे) उरलेले पेपर बोर्डाकडे पोस्टाद्वारे पाठवण्यासाठी केंद्रावर आले होते. त्यावेळी त्यांना स्ट्राँग रूमचे कुलूप कापलेल्या अवस्थेत आढळले. आत जाऊन पाहणी केली असता, भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.

​या घटनेने प्रशासकीय हलगर्जीपणाचे वाभाडे काढले आहेत. अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या स्ट्राँग रूमसमोरील सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चोरट्यांचा कोणताही सुगावा लागणे कठीण झाले आहे. तसेच, या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेला कर्मचारी घटना घडली तेव्हा नेमका कुठे होता, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

​घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, डीवायएसपी बसवराज शिवपुजे आणि स्थानिक पोलीस निरीक्षकांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने पंचनामा केला असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या पोलिसांची पथके या चोरीचा आणि चोरीला गेलेल्या प्रश्नपत्रिकांचा शोध घेत आहेत.

उद्या सकाळी भूगोल विषयाचा पेपर असतानाच आज ही चोरी झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. “उद्याचा पेपर होणार की रद्द होणार?” हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. पेपर फुटीचे प्रकार रोखण्यासाठी बोर्डाकडून कडक पावले उचलली जात असल्याचे दावे केले जात असताना, थेट स्ट्राँग रूम फोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर कडाडून टीका होत आहे.

चोरी झालेल्या प्रश्नपत्रिकांच्या संचाचा वापर करून पेपर फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षण मंडळ या केंद्रापुरती परीक्षा पुढे ढकलणार की नवीन प्रश्नपत्रिका संच पुरवणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here