उणे ८ ते १० अंश तापमानात १२,५०० फूट उंचीवर देशप्रेमाचा गौरव
सांगोल्याचे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक वैभव ऐवळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या ११ वर्षांची हृदया चव्हाण हिची ऐतिहासिक कामगिरी
हिमालयाच्या कुशीत असलेल्या केदारकंठा शिखरावर सुमारे १२,५०० फूट उंचीवर, उणे ८ ते १० अंश सेल्सिअस तापमान, खडी व कठीण चढाई तसेच वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांना सामोरे जात “वंदे मातरम्”चा निनाद करत देशप्रेमाचा अभिमानास्पद क्षण अनुभवण्यात आला.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य योगदान देणाऱ्या “वंदे मातरम्” या राष्ट्रगीताच्या १५० वर्षांच्या गौरवपूर्ण प्रवासानिमित्त तसेच ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हा विशेष देशभक्तीपर उपक्रम राबविण्यात आला.

या मोहिमेदरम्यान अत्यंत प्रतिकूल हवामान, घसरणाऱ्या वाटा, खडी चढाई आणि तीव्र थंडी असूनही सर्व सहभागी ट्रेकर्सनी अदम्य इच्छाशक्ती आणि शिस्तीच्या जोरावर शिखर गाठले. Flag Code of India मधील सर्व नियमांचे काटेकोर पालन करत ७६ भारतीय राष्ट्रध्वजांचे अत्यंत सन्मानाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने प्रदर्शन करण्यात आले. राष्ट्रध्वजाचा मान, प्रतिष्ठा आणि गौरव अबाधित ठेवण्यात आला.
या अभिमानास्पद मोहिमेत देशभरातून एकूण १२ ट्रेकर्स सहभागी झाले होते. यामध्ये
जयपूर येथील ५, सुरत येथील १, आसाम येथील १ तसेच महाराष्ट्रातील ५ गिर्यारोहकांचा समावेश होता.
वाढेगाव, सांगोला येथील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक व मार्गदर्शक वैभव ऐवळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या ११ वर्षांची हृदया चव्हाण हिने या कठीण परिस्थितीत केदारकंठा शिखरावर भारतीय राष्ट्रध्वज फडकावला. उणे तापमान, वेगवान वारे आणि कठीण चढाई असूनही तिचे धैर्य उपस्थितांसाठी विशेष प्रेरणादायी ठरले.

या मोहिमेत अमित चव्हाण, पूर्वांका वेतोस्कर, हृदया चव्हाण (वय ११ वर्षे), आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक व मार्गदर्शक वैभव ऐवळे तसेच रेश्मा यांचा समावेश होता.
विशेषतः हृदया चव्हाण हिचा सहभाग पुढील पिढीत देशप्रेम, राष्ट्रध्वजाविषयी आदर आणि राष्ट्रीय मूल्यांची जाणीव रुजत असल्याचे प्रभावी उदाहरण ठरला. तसेच वैभव ऐवळे यांच्या अनुभवी नेतृत्वामुळे ही मोहीम सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरली.
केदारकंठाच्या शिखरावर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांत “वंदे मातरम्”चे सूर घुमत असताना तो केवळ एक क्षण नव्हता, तर देशप्रेम, एकता आणि राष्ट्रभक्तीची जिवंत अनुभूती होती. ही मोहीम प्रत्येक सहभागींसाठी अभिमानाची आणि आयुष्यभर प्रेरणा देणारी ठरली.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


