सांगोला (प्रतिनिधी):जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थी जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवू शकतात, हे शिरभावी (ता. सांगोला) येथील प्राजक्ता शिवाजी घाडगे हिने सिद्ध करून दाखवले आहे. रशिया येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्राजक्ताने FMGE (Foreign Medical Graduate Examination) या अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत यश संपादन केले असून, तिचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेतून रशियापर्यंतचा प्रवास
प्राजक्ताचे प्राथमिक शिक्षण शिरभावी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षणाचा पाया भक्कम केल्यानंतर तिने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सांगोला येथील नामवंत सांगोला विद्यामंदिर प्रशाला व जुनिअर कॉलेजमध्ये पूर्ण केले. त्यानंतर सोलापूर येथील ए. डी. जोशी कॉलेजमधून पुढील तयारी करत तिने थेट रशिया गाठले. रशियात सहा वर्षे वैद्यकीय शिक्षण घेऊन २०२५ मध्ये तिने एमबीबीएस (MBBS) पदवी प्राप्त केली.

परदेशातून (रशिया, चीन, युक्रेन इ.) वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन’ कडून FMGE परीक्षा घेतली जाते.या परीक्षेचा निकाल दरवर्षी केवळ २०% ते ३०% इतकाच लागतो, ज्यामुळे ही परीक्षा अत्यंत आव्हानात्मक मानली जाते.ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे प्राजक्ताला आता भारतात NMC (National Medical Commission) अंतर्गत नोंदणी मिळून इंटर्नशिप आणि रुग्णसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिरभावी ग्रामस्थांचा सार्थ अभिमान
एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने सातासमुद्रापार जाऊन शिक्षण पूर्ण करणे आणि त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणे, ही सांगोला तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. प्राजक्ताच्या या यशामुळे शिरभावी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

“ग्रामीण भागातील मुलीने घेतलेली ही झेप कौतुकास्पद आहे. प्राजक्ताने आपल्या कष्टाने आणि जिद्दीने हे यश मिळवले असून, ती भविष्यात एक आदर्श डॉक्टर म्हणून रुग्णसेवा करेल,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
प्राजक्ताने आपल्या या यशाचे श्रेय वडील शिवाजी घाडगे, आई, कुटुंबातील सदस्य आणि सर्व गुरुजनांना दिले आहे. तिच्या या यशाबद्दल राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



