सांगोला (प्रतिनिधी):-जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकावर केलेल्या अंदाधुंद गोळीबारामुळे संपूर्ण देश हादरून गेला. संपूर्ण देशातील पर्यटक प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील थंडगार निसर्गरम्य सौंदर्याचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.
दहशतवादी हल्ला झालेल्या पहलगाम येथून अवघ्या काही अंतरावर सांगोला तालुक्यातील ८ पर्यटक होते. या सर्व पर्यटकांशी प्रशासनाचा संपर्क झाला असून सर्वजण सुखरूप असल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली.
सांगोला शहरातील राजकुमार वसंत दौंडे, गीता राजकुमार दौंडे, राजेश व्यंकटेश वालवडकर, मनीषा राजेश वालवडकर हे ४ प्रवासी जम्मू येथे सुखरूप पोहोचले आहेत. बुधवारी रात्री ११ वाजता ते ट्रेनच्या सहाय्याने परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. तर बुद्धेहाळ ता सांगोला येथील विजय सदाशिव लवटे, चंद्रकांत बाजीराव लवटे, वैभव बाजीराव लवटे व अजय ज्ञानू लवटे हे ४ प्रवासी श्रीनगर येथे सुखरूप असल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली. दरम्यान जम्मू काश्मीर येथे सांगोला तालुक्यातील ८ प्रवासी असल्याची नोंद प्रशासनाकडे असली तरीही, प्रत्यक्षात मात्र आणखी काही प्रवासी असल्याची चर्चा सुरू आहे.
आम्ही आमच्या कुटुंबीय आणि मित्र परिवारांसमवेत ११ एप्रिल रोजी वैष्णवी देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो. दर्शन घेऊन आम्ही काश्मीरला फिरायला गेलो होतो. पहलगाम येथे पर्यटकांवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आम्ही तेथून ३० ते ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या अवंतीपुरा येथे होतो. सध्या आम्ही आणि आमच्या सोबत असलेले सर्व पर्यटक सुखरूप असून सर्वजण परतीच्या प्रवासाला निघालो असल्याची माहिती राजकुमार दौंडे यांनी दिली.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक