एकनाथ शिंदेंनी उमेदवार निवडला, विधानपरिषदेवर कोणाला पाठवणार?

0

राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या वाट्याला एक जागा आली आहे. या एका जागेसाठी अनेकजण इच्छूक असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पेचात सापडले होते. पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार अगदी शेवटच्या क्षणी जाहीर केला जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. सोमवारी विधानपरिषद निवडणुकीसाठी  उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्याच संबंधित उमेदवाराला थेट विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी पाठवले जाईल, असा अंदाज होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या विधानपरिषद उमेदवाराचे नाव निश्चित केल्याची माहिती आता सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानपरिषदेच्या एकमेव जागेसाठी चंद्रकांत रघुवंशी यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे.

चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेचे धुळे – नंदुरबारचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य आहेत. त्यांना उमेदवारी देऊन एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द पाळला, असे बोलले जात आहे. या जागेसाठी मुंबईतील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती. तसेच शिवसेनेचे सचिव संजय मोरे आणि किरण पांडव हेदेखील विधानपरिषद उमेदवारीच्या शर्यतीत होते. परंतु, या सगळ्यांना डावलून एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव निश्चित केल्याची माहिती आहे. आमशा पाडवी हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे त्यांची विधानपरिषदेची जागा रिक्त झाली होती. त्याच जागेवर आता चंद्रकांत रघुवंशी यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

चंद्रकांत रघुवंशी हे 1992 पासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी काँग्रेस पक्षातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती. 1992 साली चंद्रकांत रघुवंशी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. ते सहा वर्षे धुळे व नंदुरबारच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर ते सलग तीनवेळा विधानपरिषदेत निवडून गेले. एप्रिल 2020 मध्ये त्यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन ठाकरे गटात प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर 2022 मध्ये ते शिंदे गटात दाखल झाले होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here