विद्यार्थ्यांच्या संस्कारांनी पालकांचे डोळे पाणावले; जुन्या गवळणी व भारुडांनी परिसर दुमदुमला
भोपसेवाडी (प्रतिनिधी):शनिवार दिनांक १० जानेवारी २०२६, रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोपसेवाडी येथे ‘आजी-आजोबा व माता-पिता पूजन’ कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात आयोजन करण्यात आले होते. आपल्या संस्कृतीतील वडीलधाऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमात विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या माता-पिता आणि आजी-आजोबांचे विधिवत पूजन केले. मुले जेव्हा आपल्या पालकांभोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या चरणी नतमस्तक झाली, तेव्हा उपस्थित असलेल्या माता आणि आजोबांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. आपल्या नातवांनी दिलेला हा सन्मान पाहून अनेक आजी-आजोबा भारावून गेले होते.

यावेळी बोलताना काही आजोबांनी मुलांचे कौतुक केले. “ही मुले केवळ शाळेतच नाही, तर दररोज घरीही सकाळी उठल्यावर आमचे दर्शन घेतात,” असे सांगताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. कार्यक्रमात मनोरंजनासोबतच भक्तीचा जागरही पाहायला मिळाला. काही आजोबांनी जुन्या काळातील गवळणी, भारुडे आणि गीते सादर केली, ज्यामुळे संपूर्ण शालेय परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सहशिक्षक तुकाराम बाबर सर, अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन हरिश्चंद्र सावंत गुरुजी यांनी केले.
या सोहळ्यामुळे मुलांमध्ये आपल्या पालकांविषयी आणि आजी-आजोबांविषयी असलेली आदराची भावना अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



