काय झाडी, डोंगार, काय हाटील फेम माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याच्या कारवर अज्ञाताने दगडफेक केल्याने शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयसमोरच ही कार लावण्यात आली होती. त्या कारच्या मागील बाजूस असलेल्या काचेवर दगडफेक करुन ती काच फोडण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख व मा. आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांचे पुतणे सागर पाटील हे शुक्रवारी दुपारी ३ वाजता त्यांची चार चाकी फॉर्च्यूनर गाडी क्र. एम.एच.४५ एयु १९२९ ही गाडी संपर्क कार्यालयाबाहेर उभी करून अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयात गेले असता, अज्ञात हल्लेखोरांनी अचानक येऊन दिवसाढवळ्या गाडीवर दगडे मारून गाडीच्या पाठीमागील काचा फोडल्या.
सांगोला विधानसभा मतदारसंघात नुकतेच तिरंगी लढत झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना महायुतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांचा शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांच्याकडून पराभव झाला आहे. तर, शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार दिपक साळुंखे यांचाही पराभव झाला. येथून बाबासाहेब देशमुख विजयी झाले. त्यामुळे, राज्यात एवढ्या जोरदार संख्याबळाने महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. त्यातच, माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सांगोला येथील कार्यालयासमोर त्यांचा पुतण्या सागर पाटील यांची गाडी अज्ञात तरुणाने दगड मारून फोडली. विशेष म्हणजे या वेळेला कार्यालयात बापूंचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असताना हा प्रकार घडला. मात्र, दगड मारणारा तरुण पळून गेल्याने आता सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. शहाजी बापू पाटील हे कार्यालयात नसताना हा प्रकार घडला असून पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत.
हल्ल्याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची डॉ. बाबासाहेब देशमुखांची पोलिसांना सूचना
ही घटना समजताच आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलिस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड तसेच सांगोला पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्याशी संपर्क साधून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
सांगोला तालुक्यामध्ये स्व. आबासाहेबांनी ज्या पद्धतीने सुसंस्कृत राजकारण व समाजकारण केले होते त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात सुद्धा त्याच पद्धतीचे कामकाज करण्यात येणार असून गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा देण्यात येणार नाही. त्यामुळे अशा हल्ल्यांना शेतकरी कामगार पक्ष कदापिही पाठीशी घालणार नसून या घटनेचा मी व्यक्तीशः निषेध करत असून घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक