सांगोला राजकारणात पालकमंत्र्यांचा ‘मास्टरस्ट्रोक’; ‘ऑपरेशन लोटस’ने शेकापला धक्का, भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता निश्चित!

0

सांगोला (प्रतिनिधी):सांगोला पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या पूर्वसंध्येला सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमारभाऊ गोरे यांनी राजकीय चातुर्याने सांगोला तालुक्यात ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी करून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकवली आहे. माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटाच्या तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने, सांगोला पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाचा सभापती विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गुरुवार, १२ मार्च रोजी होणाऱ्या निवडीपूर्वीच पालकमंत्र्यांनी मुंबईत आपली रणनीती आखली. माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या तिन्ही पंचायत समिती सदस्यांनी मुंबईत पालकमंत्री जयकुमारभाऊ गोरे यांच्या उपस्थितीत पूनम इंगवले (जवळा गण), अशोक चोरमुले (घेरडी गण), बापू जावीर (अजनाळे गण) यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे पंचायत समितीतील बलाबल पूर्णपणे बदलले असून महायुतीचे पारडे जड झाले आहे.

या राजकीय घडामोडींनंतर पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी महायुतीची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. या बैठकीला माजी आमदार शहाजीबापू पाटील, भाजप नेते बाळासाहेब एरंडे, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव शिंदे यांसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत सत्तेचे समसमान वाटप करण्याचे ठरले असून, पहिली संधी भारतीय जनता पक्षाला देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यानुसार प्रथम भाजपचा सभापती आणि शिवसेनेचा उपसभापती नंतर शिवसेनेचा सभापती आणि भाजपचा उपसभापती असे सूत्र ठरले आहे.

या सूत्रानुसार,सांगोला पंचायत समितीच्या पहिल्या भाजप सभापती म्हणून पूनम इंगवले तर उपसभापती म्हणून शिवसेनेचे अजय सरगर (नाझरे गण) यांची वर्णी लागणे आता केवळ औपचारिकता उरली आहे.

सांगोल्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तापालट

सांगोला पंचायत समितीत शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) 55 वर्ष वर्चस्व राहिले आहे. मात्र, महायुतीचे ५ आणि नव्याने भाजपमध्ये सामील झालेले ३ सदस्य अशा एकूण ८ सदस्यांच्या संख्याबळासह भाजपने शेकापच्या ६ सदस्यांच्या गडाला सुरुंग लावला आहे. सांगोल्यात प्रथमच भाजपचा सभापती होणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here