सांगोलाचे वैभव ऐवळे यांचाही सहभाग
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी सोलापूरच्या गिर्यारोहकांनी हिमाचलमधील माउंट शिनकुन (६०८० मी.) या शिखरावर ७९ तिरंग्यांचं भव्य ध्वजतोरण फडकवून स्वातंत्र्याचा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला.टीममध्ये बाळकृष्ण जाधव, निखिल यादव, वैभव ऐवळे आणि सुनिल खट्टे या अनुभवी गिर्यारोहकांचा समावेश होता. ही मोहीम ९ ऑगस्ट रोजी सोलंग व्हॅली (हिमाचल प्रदेश) येथून सुरू झाली होती.
उणे तापमान, ऑक्सिजनची कमतरता, जोरदार वारे, हिमवृष्टी, मोरेन्स आणि उच्चतेमुळे उद्भवणाऱ्या आव्हानांवर मात करत टीमने माउंट शिनकुनचं शिखर सर केले.माउंट शिनकून हे हिमाचलमधील मध्यम कठीण श्रेणीत गणला जाणारे शिखर आहे. आजवर फार कमी गिर्यारोहकांनी हे शिखर सर केलेले आहे. ७०-८० अंशाच्या कोणात अंगावर येणारी चढाई करताना टेक्निकल उपकरणांचा आधार घ्यावा लागतो.
टीमने दारचा गावातून ट्रेक ला सुरुवात केली. हे गाव जवळपास ३३६० मी. उंचीवर वसलेले आहे. दुसऱ्या दिवशी पुढे उंचीपर्यंत जाऊन (ॲकलमटायझेशन वॉक) पुन्हा बेस कॅम्पला(४६००मी )रात्रीचा मुक्काम केला.वेगाने वाहणारे वारे आणि जवळपास ०-१ डिग्री तापमान. अश्या परिस्थीतीमध्ये रात्र काढणे म्हणजे अशक्यच. नंतर टीम ने बेस कॅम्प ते कॅम्प १ (समिट कॅम्प) ५१०० मी. उंचीवर नेला.
समिट कॅम्प ते समिट जवळपास ८ ते ९ तासाच्या प्रवासात गिर्यारोहकांचा कस लागला. पण बर्फात लपलेला शिनकून, चहूबाजूंनी पसरलेली पर्वतरांग, ग्लेशियर आणि मनमोहक दृश्य बघताना पाठीवरचे वजन जाणवतं नव्हतं.साधारणतः हाई अल्टीट्युड वर ऑक्सिजनची कमतरता असते, उणे तापमान, वेगाने वाहणारे वारे, स्नो फॉल, मोरेन्स अशी अनेक आव्हानं समोर होती.टीमचा मागील अनुभव आणि त्यांनी केलेली शारीरिक व मानसिक तयारीच्या जोरावर ही मोहीम फत्ते झाली.
देशाचा स्वातंत्र्यदिवस शिखरमाथ्यावर राष्ट्रगीत गाऊन साजरा केला. या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याचा गौरवसुद्धा या मोहिमेत अभिमानाने साजरा केला गेला. या किल्ल्यांचे प्रतीक म्हणून १२ किल्ल्याचे ध्वजतोरणदेखील शिखरावर फडकवण्यात आले.
हा क्षण देशप्रेम, इतिहासाचा अभिमान आणि गिर्यारोहणाची आवड यांचा संगम ठरला.
यापूर्वी या टीमने देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात पदार्पण करत असताना माउंट युनाम(6111m) वरती आणि स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर माउंट जो जंगो(6250m) आणि कांग यात्से(6240m) या शिखरांवर 75 तिरंग्याचं तोरण फडकवत भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिवस साजरा केला होता. ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये झाली होती.
तत्पूर्वी वैभव यांनी आफ्रिका आणि युरोप खंडातील सर्वोच्च शिखरे माउंट किलीमांजारो आणि माउंट एलब्रूस सर करून अनुक्रमे 72 आणि 73 ध्वजांचं तोरण फडकवत स्वातंत्र्यदिवस साजरा केला होता.देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनी या टीमने केदारकंठा शिखरावरती ७५ ध्वजांच ध्वजतोरण फडकून गणतंत्र दिवस साजरा केला होता.सदर गिर्यारोहक ही मोहीम विविध सामाजिक उद्दिष्टांना समर्पित करत असून हा उपक्रम तरुण पिढीला प्रेरणा देणारा ठरणार आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक