न्यायाधीश संधूंनी ७० जोडप्यांना आणले एकत्र

0

आधूनिक युगात मोबाईलच्या फायद्याबरोबरच अनेक तोट्यांचा सामना समाजाला करावा लागत आहे. मोबाईलवरील शुल्लक मेसेज व किरकोळ कारणावरुन पती-पत्नीमध्ये वाद होतात. वादाचे पर्यावसन न्यायालयापर्यंत पोहोचते. न्यायालयात खावटी, हुंडाबळी यासह मानसिक व शारीरिक छळाच्या प्रकरणांचा न्याय निवाडा होत असतो. न्यायालयात न्याय करतांनाच येथील वरीष्ठ स्तर न्यायालयातील न्यायाधीश तेजवंतसिंघ संधू यांनी दोघांना समज देत अवघ्या पाऊणेतीन वर्षात ७० जोडप्यांना विभक्त होण्यापासून वाचवले आहे. त्यांनी मने दुभंगलेल्या या जोडप्यांना एकत्र आणत त्यांच्या संसाराची घडी बसवली आहे.

न्यायाधीश तेजवंतसिंघ संधू हे १९ वर्षापासून न्यायाधीश आहेत. त्यांनी मालेगावसह विविध न्यायालयांमध्ये न्यायदानाचे काम केले आहे. घटस्फोटाचे अनेक प्रकरणे त्यांच्याकडे येत असतात. श्री. संधू हे आलेल्या जोडप्यांचे निराकरण करुन त्यांच्या संसाराची घडी जुळवली आहे. येथील गांगुर्डे दाम्पत्यांचे प्रकरण जानेवारी २०२० पासून न्यायालयात खावटी संदर्भात दाखल होते. ८ महिन्यापुर्वी हा खटला न्यायाधीश संधू यांच्यासमोर आला. गांगुर्डे दाम्पत्याला लावण्या व जान्हवी या दोन कन्या आहेत. श्री. संधू यांनी या मुलींच्या उज्वल भविष्यासाठी तुम्ही एकत्र या असे सांगत त्यांना मार्गदर्शन केले. गांगुर्डे दाम्पत्याने न्यायाधीश संधू यांचे म्हणणे ऐकूण दोघांनी पाच वर्षानंतर पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. २२ मार्चला दोघांनी या निर्णयाचे स्वागत करत एकमेकांना गुलाबपुष्प दिले. ॲड. मनोज पवार, ॲड. एस. आर. पाटील या वादी- प्रतिवादींच्या वकीलांचीही साथ मिळाली. यावेळी ॲड. अजीम खान, ॲड. वासिफ शेख, ॲड. ए. ए. खान, ॲड. एस. के. भामरे, ॲड. सी. पी. देवरे, ॲड. अग्रवाल आदी उपस्थित होते.

ह्यावेळी नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे माननीय अध्यक्ष श्री जगमलानी आणि मालेगाव तालुका विधी सेवा समिती चे अध्यक्ष श्री कंठाळे यांचे मार्गदर्शन मिळाले

१९ वर्षात न्याय करता करता अनेक जोडप्यांना एकत्र आणले आहे. तोडणे सोपे आहे, संसाराला जोडणे हे कठीण काम असते. येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिकचे अध्यक्ष जगमलानी व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष कंठाले यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षे दहा महिन्यात ७० जोडप्यांच्या संसाराची घडी बसवली. हे पुण्याचे काम आहे. 

– तेजवंतसिंघ संधू

वरीष्ठ न्यायाधीश, मालेगाव

न्यायालयात घटस्फोट होणाऱ्या दाम्पत्याला जुळविण्याचे निर्णय कौतुकास्पद आहे. समाजात न्यायाधीश तेजवंतसिंह संधू यांच्यासारखे न्यायाधीश कमी आहेत. घटस्फोट झाल्यानंतर माझ्या मुलींना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला असता. योग्यवेळी निर्णय झाला.

– महेंद्र गांगुर्डे

न्यायाधीश संधू हे देव म्हणून आम्हाला भेटले. त्यांच्यामुळे आमचा संसार पुन्हा जुळला आहे. त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन व सल्ला दिल्याने हे शक्य झाले. न्यायाधीशांबरोबरच आमच्या वकीलांचा मोठा सहभाग आहे. 

– मनिषा गांगुर्डे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here