सोनंद (प्रतिनिधी ): दि.22 ऑगस्ट 2025 रोजी सावित्रीबाई फुले प्रशालेत मातृदिन सोहळा आनंदमय आणि भावनिक वातावरणात पार पडला. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” या कवी यशवंत यांच्या वरील ओळीप्रमाणे आईचे महत्व मानवी जीवनात अनन्यसाधारण आहे. आई शिवाय मानवी जीवन व्यर्थ आहे. प्रेम, त्याग, दया, क्षमा ,शांती ,संघर्ष जिव्हाळा समर्थन या गोष्टींचे रूप म्हणजे आई. त्यानिमित्त प्रशालेतील विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या सर्व माता-पालक यांना निमंत्रित करण्यात आले होते .सध्या बदलत चाललेली जीवनशैली, त्यामध्ये माता- पिता व अपत्य यांच्यातील कमी होत चाललेला संवाद या दृष्टिकोनातून भावनेचा ओलावा टिकून राहावा आणि संवेदनशीलता निर्माण व्हावी ,म्हणून मातृऋण व्यक्त करण्याच्या उद्देशाने प्रशालेत या समारंभाचे आयोजन करण्यात आलेले होते. यामागील सूत्रधार प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती शेडसाळे मॅडम आहेत, त्या नेहमी शाळेत असे विविध उपक्रम राबवित असतात.

या सोहळ्याची माता पालकांच्या स्वागतासाठी पूर्वतयारी म्हणून इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थीनींनी फुलांची सजावट, पुष्पहार, रांगोळी ,इत्यादी पूर्वतयारी केलेली होती. या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. डी. डी. कोळसे पाटील सर उपस्थित होते. त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व त्यांच्या मातोश्री राजाक्का दिगंबर कोळसे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले आणि उपस्थित माता पालकांना मातृदिनाच्या शुभेच्छा देऊन आई विषयीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच आलेल्या प्रत्येक माता पालकांचे त्यांच्या पाल्यांनी पुष्प अर्पण करून,औक्षण करून माता पूजन केले.तसेच प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी आई विषयी कविता वाचन सादरीकरण,भाषण, गायन यांचं सुंदर असं सादरीकरण केलं.

कार्यक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शेडसाळे एस.डी.मॅडम व सौ.सरिता कोळसे पाटील मॅडम उपस्थित होत्या. आपल्या मुलींनी आपल्या विषयी भावना व्यक्त केल्या, हे पाहून आलेल्या माता पालकांनीही त्यांच्या आई विषयीच्या भावना व्यक्त केल्या आणि थोडा वेळ समारंभाचा हॉल हृदयस्पर्शी व भावनिक वातावरणात बुडून गेला.सौ.सरिता कोळसे पाटील मॅडम यांनी मातृदिनाचे महत्त्व सांगून त्या दिवशीच्या त्यांच्या मनातील भावना सर्वांसमोर व्यक्त केल्या. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शेडसाळे एस. डी. मॅडम यांनी भावनिक वातावरण सावरत “मा तू कितनी अच्छी है” हे चेहऱ्यावर हसू आणणारे गीत सादर करून कार्यक्रमास उपस्थित सर्वाचे आभार मानले. कार्यक्रमाच्या साहित्य उपलब्धतेसाठी प्रशालेचे सहशिक्षक श्री. तांबोळी सर यांचे सहकार्य लाभले .तसेच आमचा ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी केशव काशीद यांनी स्वयंस्फूर्तीने साऊंडची व्यवस्था उपलब्ध करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी इनामदार तबस्सुम मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पडावा यासाठी कुमारी श्रुतिका काशीद मॅडम यांनी विशेष परीश्रम घेतले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


