सांगोला: (प्रतिनिधी)सोलापूर जिल्हा परिषदेच्या भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी करमाळ्याच्या खंबीर नेत्या रश्मी बागल यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे पार पडलेल्या भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. आगामी काळात जिल्हा परिषदेमध्ये प्रथमच स्वीकृत सदस्यांच्या निवडी होणार असल्याने, या निवडीला राजकीय वर्तुळात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

जिल्हा परिषदेतील भाजपची धुरा प्रभावीपणे सांभाळण्यासाठी पक्षाने अनुभवी आणि तरुण चेहऱ्यांची सांगड घातली आहे. मुंबईतील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गटनेतेपदी रश्मी बागल (करमाळा), उपनेतेपदी प्रदीप खांडेकर (मंगळवेढा), प्रतोदपदी चेतनसिंह केदार (सांगोला), प्रवक्तापदी नेताजी खंडागळे (दक्षिण सोलापूर) निवड जाहीर करण्यात आल्या आहे.

करमाळा तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या रश्मी बागल यांच्याकडे गटनेतेपद सोपवून पक्षाने महिला नेतृत्वाला संधी दिली आहे. त्याचबरोबर सांगोला तालुक्यातील चेतनसिंह केदार यांची ‘प्रतोद’ (Whip) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सभागृहातील शिस्त आणि सदस्यांना मतदानासाठी आदेश काढण्याचे महत्त्वाचे काम केदार यांच्याकडे असणार आहे. सांगोला तालुक्यातून मिळालेल्या या जबाबदारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

जिल्हा परिषदेमध्ये लवकरच स्वीकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेत गटनेत्याची भूमिका अत्यंत निर्णायक असते. रश्मी बागल यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील भाजपच्या गटबाजीला लगाम बसण्याची आणि पक्षाची बाजू अधिक प्रभावीपणे मांडली जाण्याची शक्यता आहे.

मंगळवेढ्याचे प्रदीप खांडेकर आणि दक्षिण सोलापूरचे नेताजी खंडागळे यांच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या सर्व भागांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांवर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मोठी जबाबदारी असणार आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



