सांगोला (प्रतिनिधी): तालुक्यातील जवळा परिसरात वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली आहे. या हल्ल्यात दोन कर्मचारी जखमी झाले असून, सरकारी वाहनाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवळा मंडलात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तहसील कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज पहाटे सांगोल्याचे मंडल अधिकारी महेश जाधव व त्यांचे सहकारी कारवाईसाठी घटनास्थळी दाखल झाले. पथकाला पाहताच वाळू तस्करांनी आक्रमक पवित्रा घेत पथकावर तुफान दगडफेक सुरू केली. वाळू माफियांनी केवळ दगडफेकच केली नाही, तर महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. यावेळी तहसील कार्यालयाच्या शासकीय गाडीवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या भीषण हल्ल्यात दोन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

महसूल कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’ आंदोलन
आपल्या सहकाऱ्यांवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोला तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

“कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ले होणे ही गंभीर बाब आहे. जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील,” अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
या घटनेमुळे सांगोला तालुक्यात खळबळ उडाली असून, वाळू माफियांच्या वाढत्या दहशतीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



