सांगोला (प्रतिनिधी): सांगोला नगरपरिषद प्रशासनाने थकबाकीदारांविरुद्ध आता आक्रमक पवित्रा घेतला असून, वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरणाऱ्या गाळेधारकांवर थेट जप्तीची कारवाई सुरू केली आहे. आज भाजी मंडई लगतच्या एका गाळ्याला प्रशासनाने सील ठोकले असून, या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

आरक्षण क्रमांक २३, भाजी मंडई लगत असलेला गाळा क्रमांक ७ अ चे धारक सत्तार इ. आतार यांच्याकडे नगरपरिषदेची दोन वर्षांहून अधिक काळाची ५४,५७१/- रुपये रक्कम थकबाकी होती. ही रक्कम भरण्याबाबत वारंवार कळवूनही प्रतिसाद न मिळाल्याने, सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी सदर गाळा सील करण्याचे आदेश दिले.

मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, प्रशासकीय अधिकारी श्री. सचिन दगडू पाडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वसुली पथकाने आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन गाळ्याला टाळे लावून तो सीलबंद केला.

नगरपरिषदेचा विकासकामांसाठीचा निधी हा कर वसुलीवर अवलंबून असतो. त्यामुळे शहरातील ज्या गाळेधारकांनी किंवा मालमत्ताधारकांनी अद्याप आपला कर भरलेला नाही, त्यांनी कोणतीही कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी तात्काळ नगरपरिषद कार्यालयात जाऊन थकबाकी जमा करावी.

जप्तीसारखी कटू कारवाई टाळून शहराच्या विकासात सहकार्य करावे. “येणाऱ्या काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असून, कारवाई करण्यापूर्वी गाळेधारकांनी स्वतःहून थकबाकी भरावी.” असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



