सांगोला(प्रतिनिधी):- अजुन एप्रिल मे महिने बाकी असून सांगोला तालुक्यात पाण्याची टंचाई अनेक भागात भासत आहे. शेतीच्या पाण्यावरुन शेतकरी चिंतेत असताना अज्ञात इसमाने टेंभू उपसा योजनेच्या कॅनलचे गेट बंद केल्याने कालवा फुटुन 10 दल.घ.फू पाणी वाया जावून शेत जमिन पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची घटना हटकर मंगेवाडी येथे 31 मार्च रोजी पहाटे 5 वाजणेच्या सुमारास घडली. कालव्याचे पाणी परिसरातील शेतकर्यांच्या शेतातही पाणी घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून घटनेची फिर्याद जुनोनी येथील पाटबंधारे शाखेचे क.अभियंता महेश पाटील यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.
टेंभू योजनेच्या माध्यमातून माण खोर्यातील कडेगाव, खानापूर, सांगोला, आटपाडी, कवठेमहांकाळ या दुष्काळी पट्टयाला वरदान ठरणारी ही योजना आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाण्याचे आवर्तन सध्या सुरु आहे. टेंभु उपसा सिंचन प्रकल्प अंतर्गत असलेला सांगोला कालवाचा कॅनल असुन मौजे हातीद येथील साखळी क्र 36520 मिटर येथील सी. आर. गेट कोणीतरी अज्ञात इसमाने बंद केल्याने सदर पाण्याचा फुगवटा होवून हटकर मंगेवाडी हद्दीतील साखळी क्र.36000 मीटर येथे कालवा फुटुन कालव्याचे पाण्यामुळे शेत जमिन पिकांचे लाखोचे नुकसान झाले असल्याचे पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.पुढील तपास पोहेको कोष्टी हे करीत आहेत.
सदर घटनेबाबत टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अधिकार्यांना कल्पना नव्हती. पण शेतकर्यांनी सांगितल्यानंतर अधिकारी आले. पण पाण्याच्या प्रवासापुढे कोणीच काही करु शकले नाही. कालव्याच्या सोबवताली तलावाच्या बांधावर असणार्या बागेमध्ये पाणी गेल्याने अनेक बागांचे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात लाखो लीटर पाणी वाया गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक