कमलापूर केंद्र शाळेत ‘वैदिक गणित’ वर्गाचा श्रीगणेशा; प्राचीन वारसा आणि आधुनिक प्रगतीचा संगम

0

कमलापूर (प्रतिनिधी):एकविसाव्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच अनुषंगाने, भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा जपण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची गणिती कौशल्ये विकसित करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, कमलापूर येथे ‘वैदिक गणित’ वर्ग सुरू करण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.

वैदिक गणितामुळे विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांसारख्या मूलभूत क्रियांसह पदावली आणि शाब्दिक उदाहरणे अवघ्या काही सेकंदात सोडवणे शक्य होणार आहे. गणितातील क्लिष्ट प्रश्न सोडवण्याची कला आत्मसात झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना गुरुवर्य श्री. सुरेश शिवदास ढोले गुरुजी म्हणाले की, “आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांमध्ये स्पर्धा परीक्षेची बीजे लहानपणापासूनच रुजवणे आवश्यक आहे. वैदिक गणिताच्या सरावामुळे मुले गणिती क्रिया जलदगतीने आत्मसात करतील, ज्याचा फायदा त्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चितपणे होईल.”

शाळेचे मुख्याध्यापक श्री. बशीर जैनुद्दीन मुलानी गुरुजी यांनी उपक्रमाचे महत्त्व सांगताना स्पष्ट केले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाळेची गुणवत्ता उंचावण्यासाठी आम्ही हे वर्ग सुरू केले आहेत. केवळ हुशारच नव्हे, तर गणितात कमजोर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि पंचक्रोशीतील मुला-मुलींनी या संधीचा लाभ घ्यावा.”

या  उद्घाटन प्रसंगी कमलापूर गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ. रुपाली सत्यवान तंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन बजरंग पुजारी, माजी सरपंच श्री. बाबुराव धोंडीराम बंडगर आणि डॉ. सतीश तंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच विपुल मारुती गोडसे, देवळे मला शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामचंद्र लिंबाजी तांडे गुरुजी, कमलापूर शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचीन भारतीय वारशाची जपणूक करत शाळेने उचललेल्या या पावलाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here