सांगोलकरांचा श्वास कोंडला! शहरात धुळीचे साम्राज्य, प्रशासन सुस्त.

0

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरात ठिकठिकाणी पसरलेले धुळीचे साम्राज्य, उखडलेले रस्ते आणि विस्कळीत वाहतूक यामुळे सांगोलकर अक्षरशः हैराण झाले आहेत.शहरातील रेल्वे गेटचे महत्त्वाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. हे काम सुरू असल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून ती शहराच्या अंतर्गत रस्त्यांवरून वळवण्यात आली आहे. हजारो दुचाकी आता अरुंद गल्ल्यांमधून धावत आहेत. सततच्या या वर्दळीमुळे रस्त्यावरील साचलेली माती हवेत उडत असून, संपूर्ण शहरावर धुळीचे पांढरे पडदे दिसत आहेत.

एकीकडे वाहतुकीचा ताण असतानाच, दुसरीकडे शहरात भूमिगत गटारींच्या कामामुळे मुख्य आणि अंतर्गत रस्ते उकरून ठेवण्यात आले आहेत. काम संपल्यानंतरही अनेक ठिकाणी खड्डे नीट बुजवण्यात आलेले नाहीत किंवा त्यावर खडी टाकून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. या कच्च्या रस्त्यांवरून जेव्हा वाहने धावतात, तेव्हा धुळीचे लोट उठतात, ज्यामुळे समोरचा रस्ताही दिसत नाही.

यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांना श्वसनाचे विकार, खोकला आणि डोळ्यांचे आजार जडत आहेत. तसेच रस्त्याकाठच्या हॉटेल व्यावसायिकांच्या आणि दुकानदारांच्या मालावर धुळीचे थर साचत असल्याने ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. हवेत धुळीचे प्रमाण जास्त असल्याने ‘व्हिजिबिलिटी’ (दृश्यमानता) कमी होऊन अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नागरिकांनी तक्रारी करूनही प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. जिथे धुळीचे प्रमाण जास्त आहे तिथे नियमितपणे पाणी फवारणी करणे आवश्यक असताना सांगोला शहरात अशी कोणतीही यंत्रणा राबवली जात नसल्याचे चित्र आहे.

रस्त्यावर दिवसातून किमान ३ ते ४ वेळा टँकरने पाणी मारण्यात यावे.अशी मागणी नागरिकांनी केली आहे. “जर येत्या दोन-तीन दिवसांत प्रशासनाने रस्त्यावर पाणी मारण्यास सुरुवात केली नाही, तर सांगोला नगरपालिकेसमोर ‘धुळफेक आंदोलन’ करण्यात येईल,” असा इशारा त्रस्त रहिवाशांनी दिला आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here