सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आज मुंबई येथे कृषिमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांची भेट घेत तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून प्रभावित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

आज मंत्रालय येथे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची भेट घेत सांगितले की सांगोला तालुक्यातील चोपडी, नाझरे, बलवडी, सोमेवाडी, हातीद, उदनवाडी, गौडवाडी आदी गावांमध्ये आणि आसपासच्या परिसरातील डाळिंब, द्राक्ष, पेरू, भाजीपाला व इतर पिकांवर गारपिटी आणि अवकाळी पावसाचा मोठा परिणाम झाला असून गारपिटीमुळे फळबागांच्या संरक्षक जाळ्या खराब झाल्या असून झाडे उन्मळली आहेत आणि उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून या नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी संबंधित महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी.”

यावेळी कृषी मंत्री डॉ. दत्तात्रय मामा भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.

यावेळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे मान्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



