सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरात कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात दूध घालून रात्रीच्या सुमारास आपल्या घराकडे परतत असलेले ७० वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि ज्येष्ठ नागरिक अरुण तुकाराम वाघमोडे यांना दोन अज्ञात तोतया पोलिसांनी अडवून लुटण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सांगोला शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कमालीचा गंभीर बनला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे व भीतीचे वातावरण पसरले आहे.

पंढरपूर रोडवरील फॅबटेक कॉलेजच्या पाठीमागे राहणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण वाघमोडे हे दररोज सायंकाळी शहरात दूध घालण्यासाठी जातात. गुरुवार, ११ जून रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे दूध घालून रात्री ७ ते ८ च्या सुमारास ते घरी परतत होते. पंढरपूर रोडवरील नरुटे वस्ती जवळ आले असता, मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबवले.

“आम्ही पोलीस आहोत, तुमच्याकडे गुटखा, पानमसाला किंवा गांजा आहे का? तुमची तपासणी करायची आहे,” अशी बतावणी करत त्यांनी वाघमोडे यांच्या खिशाची झडती घेण्यास सुरुवात केली. खिशात काहीच न आढळल्याने वाघमोडे यांना संशय आला. त्यांनी संबंधित इसमांकडे ओळखपत्राची मागणी केली. चोरट्यांनी खिशात हात घातला मात्र ओळखपत्र दाखवले नाही. यावर वाघमोडे यांनी, “जवळच पोलीस स्टेशन आहे, चला तिथेच जाऊन काय ती तपासणी करा,” असे ठणकावून सांगितले.

पोलीस स्टेशनचे नाव ऐकताच चोरटे थोडे बिथरले. मात्र, तेवढ्यात एका चोरट्याने मोबाईलच्या बॅटरीचा प्रकाश वाघमोडे यांच्या गळ्यावर टाकला. प्रकाश पडताच वाघमोडे यांच्या गळ्यातील सोन्याच्या लॉकेट (चैन) वर चोरट्यांची नजर गेली. त्यांनी तात्काळ ती चैन ओढण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांचा इरादा लक्षात येताच वाघमोडे यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरडा केला आणि ते जवळच असलेल्या एका पाईपच्या दुकानाच्या दिशेने धावले. वाघमोडे यांच्या ओरडण्याने दुकानातील माणूस बाहेर आला, हे पाहताच दोन्ही तोतये पोलीस अंधाराचा फायदा घेऊन मोटारसायकलवरून पसार झाले.

या धक्कादायक प्रसंगानंतर अरुण वाघमोडे यांनी सांगोला पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली आणि लेखी तक्रार केली. त्यांनी या गुन्ह्याची रीतसर प्रथम खबरी अहवाल (FIR) मध्ये नोंद करण्याची मागणी केली. मात्र, टाळाटाळ करत ठाणे अंमलदारांनी “आम्ही तपास करतो, तुम्ही अर्ज देऊन जा,” असे सांगत परत पाठवल्याचे तक्रारदाराने सांगितले.
अत्यंत वर्दळीच्या या मुख्य रस्त्यावर जर ७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला अडवून लुटण्याचा प्रयत्न होत असेल, तर सांगोल्यात सामान्य नागरिक, महिला आणि वृद्ध सुरक्षित आहेत का? असा संतप्त सवाल सांगोलेकर विचारत आहेत. या प्रकरणातील तोतया पोलिसांना तात्काळ अटक करून शहरात पोलिसांचा धाक निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



