हेमलकसा येथून माउंट कनामो शिखरमोहिमेचा डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते दिमाखदार ‘फ्लॅग ऑफ’

0

सांगोल्याचे वैभव ऐवळे १५ ऑगस्ट रोजी शिखरावर फडकणार तिरंगा

विशेष प्रतिनिधी: गडचिरोलीतील दुर्गम भागात समाजसेवेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या ‘लोक बिरादरी प्रकल्प’ आश्रमशाळेच्या सुवर्ण महोत्सवी (५० व्या) वर्षाचे औचित्य साधून, हिमाचल प्रदेशातील अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या माउंट कनामो (उंची: ५,९७४ मीटर / १९,४५० फूट) या शिखरमोहिमेचा ‘फ्लॅग ऑफ’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून या मोहिमेला अधिकृत सुरुवात करण्यात आली.

भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येत्या १५ ऑगस्ट रोजी माउंट कनामोच्या ५,९७४ मीटर उंच शिखरावर पूर्ण अभिमानाने राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्याचा दृढ संकल्प या मोहिमेतील साहसी गिर्यारोहकांनी केला आहे.

‘फ्लॅग ऑफ’ सोहळ्यादरम्यान गिर्यारोहकांनी लोक बिरादरी आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी गिर्यारोहण या साहसी आणि शिस्तबद्ध क्षेत्राची सविस्तर माहिती दिली. प्रतिकूल परिस्थितीतही माघार न घेता उद्दिष्ट कसे गाठायचे, याचा वस्तूपाठ त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

आपल्या विविध शिखरमोहिमांचे थरारक अनुभव कथन करताना गिर्यारोहकांनी विद्यार्थ्यांना साहस, जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा दिली. गिर्यारोहकांच्या या गप्पांमुळे आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह, कौतुक आणि कुतूहलाचे वातावरण पाहायला मिळाले.

या विशेष मोहिमेत महाराष्ट्रातील अनुभवी आणि निष्णात वैभव ऐवळे (सांगोला, जिल्हा सोलापूर),बाळकृष्ण जाधव (सोलापूर), अमित चव्हाण, करण यादव ही चार सदस्यीय टीम ७ ऑगस्ट रोजी हेमलकसा येथून मोहिमेसाठी रवाना झाली आहे. माउंट कनामो सर करताना गिर्यारोहकांना अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. यात प्रामुख्याने उणे तापमान (Sub-zero Temperature), ऑक्सिजनची तीव्र कमतरता, वेगवान आणि बोचरे वारे, अचानक होणारी हिमवृष्टी, धोकादायक मोरेन्स (Moraines) आणि उच्च उंचीवरील प्रतिकूल हवामान यांसारख्या नैसर्गिक अडथळ्यांचा समावेश असेल.

या मोहिमेतील टीमने यापूर्वीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक उल्लेखनीय मोहिमा फडकवून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे: स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल टीमने माउंट युनाम (६,१११ मी.), माउंट जो जंगो (६,२५० मी.) आणि कांग यात्से (६,२४० मी.) या ६ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांवर तब्बल ७५ तिरंग्यांचे तोरण फडकवून ऐतिहासिक कामगिरी केली होती. या अद्वितीय कामगिरीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये झाली आहे. मोहिमेचे नेतृत्व करणारे वैभव ऐवळे यांनी आफ्रिका खंडातील सर्वोच्च माउंट किलीमांजारो (५,८९५ मी.) आणि युरोप खंडातील सर्वोच्च माउंट एलब्रूस (५,६४२ मी.) हे दोन्ही पर्वत सर करून अनुक्रमे ७२ आणि ७३ ध्वजांचे तोरण फडकवण्याचा अद्भूत विक्रम केला आहे. गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी याच टीमने यू.टी. कांगरी (६,०७० मी.) आणि माउंट शिनकून ईस्ट (६,०८१ मी.) ही अत्यंत कठीण शिखरे यशस्वीरीत्या पादाक्रांत केली होती.

 

 

ही मोहीम केवळ एका साहसी मोहिमेपुरती मर्यादित नसून, त्याद्वारे अत्यंत महत्त्वाचे सामाजिक संदेश दिले जात आहेत:   स्वतः ‘ऑर्गन डोनर’ (अवयवदाते) असलेले गिर्यारोहक वैभव ऐवळे यांनी समाजात अवयवदानाविषयी अजूनही मोठ्या प्रमाणावर जनजागृती होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. “मृत्यूनंतरही कोणालातरी नवीन आयुष्य देण्याची क्षमता अवयवदानात आहे. हा संदेश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या मोहिमेच्या माध्यमातून जनजागृती करत आहोत,” असे त्यांनी सांगितले.

ब्रॉड पीक (Broad Peak) शिखरावर झालेल्या दुर्दैवी हिमस्खलनात ज्या साहसी गिर्यारोहकांनी आपले प्राण गमावले, त्यांना या मोहिमेच्या माध्यमातून विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असल्याची भावूक माहिती बाळकृष्ण जाधव यांनी दिली.

डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी गिर्यारोहकांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि मोहिमेच्या यशासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.

“Climb for India, Live for Humanity” (भारतासाठी चढा, मानवतेसाठी जगा) हा मूलमंत्र डोळ्यांसमोर ठेवून ही टीम पुढे जात आहे. तरुण पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, साहसी वृत्ती, सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेची प्रेरणा निर्माण करणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे टीमतर्फे स्पष्ट करण्यात आले.साहस, देशभक्ती, सामाजिक भान आणि मानवी सेवेचा त्रिवेणी संगम साधत ही टीम आता ‘माउंट कनामो’च्या हिमशिखराकडे कूच करत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here