सांगोला (प्रतिनिधी): जिथे अधिक प्रवाशी तिथे अधिक गाड्या या धर्तीवर सांगोला- दापोली बस सेवा सुरु करावी या मागणीचे निवेदन शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने एस टी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना देण्यात आले आहे.

सांगोला व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विटा, कराड, चिपळूण, खेड, दापोली या भागात विद्यार्थी, नोकरवर्ग आहेत शिवाय अनेक नागरिकांची कोकण भागात नेहमी ये -जा सुरु असते या भागातून वरील ठिकाणी जाण्यासाठी सांगोला येथून एकही डायरेक्ट बस सेवा उपलब्ध नसल्याने सांगोला ते आटपाडी व तिथून इतर बसेस बदलत चढ उताराचा प्रवास करावा लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने ही गैरसोय दूर व्हावी व प्रवाशांना सोईचा प्रवास घडावा यासाठी प्रवाशांच्या वतीने संघटनेकडून सांगोला आगारास सांगोला दापोली बस सुरु करण्याचे निवेदन देण्यात आले होते.

त्यास अनुसरून सांगोला आगारातून उन्हाळा हंगामामध्ये सांगोला -दापोली ही बस नाझरे,आटपाडी, खानापूर, विटा, कराड, खेड, चिपळूण, मार्गे दापोली ही सेवा सांगोला येथून सकाळी ८. ०० वा सुरु करण्यात आली होती. सदरच्या सेवेमुळे प्रवाशांची कित्येक वर्ष्यापासूनची गैरसोय दूर झाल्याने व थेट (डायरेक्ट) सेवा सुरु झाल्याने प्रवाशामध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण पसरले होते. सदरच्या बसला प्रवाशांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्याने बसच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात दैनंदिन वाढ होत होती.

परंतु काही महिन्यातच शाळा सुरु झाल्याने बस संख्या अपुरी असल्याकारणाने सदरची सेवा पूर्णतः बंद करण्यात आली. सेवा बंद झाल्याने पुन्हा प्रवाशांच्या नशिबी बस बदलत व चढ उताराचा प्रवास आल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागल्याने प्रवाशात नाराजी पसरली व सदरची सेवा पुन्हा कायमस्वरूपी सुरु करावी अशी मागणी होऊ लागली.
याबाबत पुनःश्च निवेदन देण्यात आले आहे तसेच अनेक वेळा सांगोला आगार प्रमुख यांना भेटून बस सेवा सुरु करण्याबाबत विनंती करण्यात आली असता त्यांनी सद्या बसेस उपलब्ध नसल्याने सुरु करण्यात अडचण येत असल्याचे सांगण्यात येत होते काही महिन्यांनी सांगोला आगारास जिजाऊ बसेस प्राप्त झाल्या त्यावेळी पुनःश्च भेटण्यात आले दूरध्वनी वरून पण बोलण्यात आले तर जिजाऊ बस लांब पल्याला वापरता येत नाहीत असे सांगून दुसऱ्या नवीन बसेस आल्यावर किंवा दिवाळीमध्ये बघूया असं सांगण्यात आले. वास्तविक अनेक आगारातून जिजाऊ बसेस आगाराच्या सोईनुसार लांब पल्याला वापरताना दिसत असताना सांगोला आगारास काय अडचण येते? तसेच जिजाऊ बसेस ग्रामीण भागात फक्त वापरायच्या असा नियम असताना मग या आगारातून अनेक वेळा लांब पल्याला बसेस वापरताना दिसून आल्या आहेत. वास्तविक प्रवाशांच्या मागणीचा विचार करून जरी जिजाऊ बस देता येत नसतील तर दुसऱ्या तरी बसेस ते देऊ शकले असते पण त्यांनी उडवाउडवीची उत्तर देऊन बस सुरु करण्यास टाळाटाळ केली आहे.

तसेच सदर बस सुरु करावी अशी प्रवाशांची मोठी मागणी असताना त्याकडे दुर्लक्ष व टाळाटाळ करून ज्या मार्गांवर प्रवाशांची मागणी नाही व त्या मार्गांवर बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रवाशांची गैरसोय होत नाही अशा मार्गांवर जादा बसेस सुरु केल्या आहेत.वास्तविक सांगोला येथून सकाळी ७ ते ७. ३० च्या दरम्यान सांगली सांगोला पंढरपूर सोलापूर लातूर ही बस असताना पुन्हा त्याच वेळेत त्याच मार्गांवर सांगोला -लातूर बस सुरु केली आहे. तसेच सांगोलाहुन पुण्याला जाण्यासाठी सकाळी ७. व ७. ३० वा बस असताना पुन्हा ७. ४५ वा जादा नवीन बस सुरु केली आहे तसेच अनेक वेळा सांगोला पंढरपूर उमरगा, सांगोला पंढरपूर गाणगापूर, सांगोला पंढरपूर कलबुरगी या जादा बसेस सोडण्यासाठी यांच्याकडे बसेस उपलब्ध आहेत पण प्रवाशांची मागणी असलेली सांगोला- दापोली बस सुरु करण्यासाठी बसेस नाहीत.

एकीकडे सांगोला आगाराकडे वरील बसेसची मागणी नसताना, त्या मार्गांवर बसेसची संख्या सर्वाधिक असताना प्रवाशांची गैरसोय होत नसताना जादा बसेस कशासाठी चालू केल्या? त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाची मान्यता आहे का? आणि दुसरीकडे दापोली मार्गांवर सर्वाधिक मागणी असताना त्या मार्गांवर का टाळाटाळ करण्यात येत आहे? याची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी व प्रवाशांच्या मागणीची व डायरेक्ट सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय याचा विचार करून सांगोला आगारातून सांगोला दापोली बस पूर्ववत सुरु करण्याची मागणी अशोक कामटे संघटनेने केली आहे. तसेच जर सांगोला आगाराकडे बसेस उपलब्ध नसतील तर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जिथे अधिक प्रवाशी तिथे अधिक गाड्या या आपल्या नवीन धोरणानुसार चिपळूण, दापोली, खेड व इतर आगाराकडून सुरु करण्यात यावी पण प्रवाशांची गैरसोय दूर करावी. अशी मागणी केल्याचे अध्यक्ष निलकंठ शिंदे सर यांनी सांगितले. या निवेदनाच्या प्रती मा. आमदार ॲड शहाजीबापू पाटील,मा. महाव्यवस्थापक,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई सेंट्रल मुंबई, विभाग नियंत्रक,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर विभाग,सोलापूर. यांनाही अशोक कामटे संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



