जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून सांगोला-मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

0

पिकांचे नुकसान, पाणीटंचाई व चारा उपलब्धतेचा घेतला आढावा; पंचनामे सरसकट व अचूक करण्याचे निर्देश

सांगोला : सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी सांगोला तालुक्यातील विविध गावांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी पिकांचे नुकसान, पाणीटंचाई तसेच चारा उपलब्धतेचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगोला तालुक्यातील वाणीचिंचाळे, वाकी-घेरडी, बुरलेवाडी, राजापूर आणि वाढेगाव आदी गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शेतीमधील पिकांची पाहणी करून नुकसानीची प्रत्यक्ष माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.

दुष्काळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. नुकसानीचे पंचनामे सरसकट आणि अचूक पद्धतीने करण्यात यावेत, तसेच पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

याशिवाय चारा डेपो आणि चारा छावण्यांऐवजी शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पाणीटंचाई आणि जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता याबाबतही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव, मंगळवेढा विभागाचे उपविभागीय अधिकारी माळी, सांगोल्याच्या तहसीलदार बाळूबाई भागवत, सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव तसेच कृषी सहाय्यक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here