निर्याततज्ज्ञ शरद नानापुरे करणार मार्गदर्शन
सांगोला (प्रतिनिधी) : डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेची माहिती मिळावी, डाळिंब निर्यातीच्या संधी समजाव्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या उत्पादनाला चांगला भाव मिळवण्यासाठी आवश्यक बाबींचे मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने माणगंगा परिवार, सांगोला यांच्या वतीने विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता रामकृष्ण गार्डन हॉल, सांगोला येथे हे चर्चासत्र होणार असल्याची माहिती मानगंगा परिवाराचे सर्वेसर्वा श्री. नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी दिली.

या चर्चासत्रात APEDA चे माजी सल्लागार आणि निर्यात क्षेत्रातील २५ वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ श्री. शरद नानापुरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांनी आतापर्यंत १०० हून अधिक निर्यातदार आणि ९५ हून अधिक आयातदार घडवले असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

डाळिंबाची जागतिक बाजारपेठ, निर्यातीची प्रक्रिया, उत्पादनाचा दर्जा, पॅकेजिंग, निर्यातीसाठी आवश्यक निकष तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डाळिंबाला चांगला दर मिळवण्याच्या संधी अशा महत्त्वाच्या विषयांवर या चर्चासत्रात सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. जागतिक बाजारपेठेतील संधींचा लाभघेऊन डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यात क्षेत्राकडे वळावे, या दृष्टीने हे चर्चासत्र उपयुक्त ठरणार आहे.

सांगोला तालुक्यात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी असून, निर्यातीच्या माध्यमातून शेतीमालाला अधिक चांगली बाजारपेठ मिळवण्याची संधी आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित चर्चासत्राचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माणगंगा परिवाराचे सर्वेसर्वा श्री. नितीन (आबासाहेब) इंगोले यांचे कडून करण्यात आले आहे.नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी ९७६६४२६२५७ /९७६६४२६२५९ या क्रमांकावर संपर्क साधा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



