सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील वासुद-अकोला या गावचे सुपुत्र आणि निष्णात फिजिशियन डॉ. निरंजन आनंदराव केदार (एम.डी. मेडिसिन) यांना त्यांच्या आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या कर्तुत्वाचा सन्मान करत “छावा राज्यस्तरीय पुरस्कार” यांनी सन्मानित करण्यात आले आहे. गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून नवजीवन देणाऱ्या डॉ. केदार यांना पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

छावा सर्वसामान्य जनतेचा…,छावा सामाजिक कर्तुत्वाचा…, छावा अनोख्या आरोग्य सेवेच्या कार्यपद्धतीचा…!
मुंबई येथील ऐतिहासिक मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये संघर्ष योद्धा मनोज पाटील यांच्या गरजवंत मराठ्यांचा लढा या आंदोलनामध्ये तसेच मराठा क्रांती मोर्चा यांच्या आंदोलनामध्ये सर्व टीम घेऊन अत्यावश्यक आरोग्य सेवा व आपत्कालीन ॲम्बुलन्स सेवा पुरवणारे मराठा सेवक म्हणून डॉ.निरंजन केदार यांचा नावलौकिक आहे. सदैव देव देश आणि धर्मासाठी असणाऱ्या कार्यक्रमांमध्ये स्वयंस्फूर्तीने भाग घेऊन अतिशय मोलाचे असे सामाजिक कार्यात योगदान डॉक्टर साहेबांचे असते. शिव शाहू फुले आंबेडकर अशा पुरोगामी विचारसरणीच्या आणि पुरोगामी विचार जपणाऱ्या डॉ. निरंजन केदार यांनी नेतृत्व, आचरण आणि कर्तृत्वातून खऱ्या अर्थाने आपला विचार जोपासला आहे ही खूप मोलाची बाब आहे. समाजाच्या कोणत्याही कामांमध्ये अत्यंत अग्रेसर असणाऱ्या डॉक्टर साहेबांच्या कार्यपद्धतीचे सर्व मान्यवरांकडून कौतुक होत आहे. “जिथे कमी तिथे आम्ही” अशी भूमिका राबवल्यामुळे जनमानसात म्हणजेच तो कोणत्याही जाती-धर्माचा असू द्या डॉक्टर आपुलकीने विचारपूस करून त्याला योग्य पद्धतीने सेवा दिल्याशिवाय शांत बसत नाहीत त्यामुळेच डॉक्टरांची प्रतिमा सर्वसामान्य लोकांमध्ये अतिशय चांगली असून ही चर्चेची बाब आहे.

आरोग्य सेवेतून सक्रिय समाजकारणाकडे वाटचाल
डॉ.निरंजन केदार हे सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे अत्यंत विश्वासु निकटवर्तीय असून , हृदररोग तज्ञ आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.निकीताताई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक ,राजकिय ,शैक्षणिक ,
वैद्यकीय आणि आरोग्य सेवेमध्ये झोकून देऊन कार्य करत आहेत व सर्वच क्षेत्रात अतिशय सक्रिय आहेत.सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व. गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अशा सुशिक्षित आणि संवेदनशील तरुणांनी समाजकारणात सक्रिय होणे ही काळाची गरज असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे.

हलाखीच्या परिस्थितीतून यशाचे शिखर
डॉ. निरंजन केदार यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचे वडील श्री. आनंदराव गणपती केदार यांनी रयत शिक्षण संस्थेत ग्रंथपाल म्हणून काम करताना, घराच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. वडिलांचे कष्ट आणि प्रामाणिकपणा या संस्कारांच्या शिदोरीवर डॉ. निरंजन यांनी बालवाडी ते सातवीपर्यंतचे शिक्षण कराड येथे, तर दहावीपर्यंतचे शिक्षण पंढरपूरच्या यशवंत विद्यालयात अव्वल क्रमांकाने पूर्ण केले. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून बारावीची गुणवत्ता मिळवून त्यांनी शासकीय कोट्यातून वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग मोकळा केला.

रयतचे संस्कार आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व
डॉ. केदार यांच्या व्यक्तिमत्त्वावर कर्मवीर अण्णांच्या विचारांचा मोठा पगडा आहे. साताऱ्याच्या आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला, ज्याची दखल घेत त्यांना ‘आदर्श विद्यार्थी’ पुरस्काराने गौरवण्यात आले. पुढे बेळगावच्या नामांकित के.एल.ई. विद्यापीठातून एम.डी. करताना त्यांनी परराज्यातही आपली मोहोर उमटवत ‘सर्वोत्कृष्ट पदव्युत्तर विद्यार्थी’ हा बहुमान पटकावला.
‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’
गेल्या ५ वर्षांपासून डॉ. केदार सांगोला तालुक्यात केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता माणुसकीच्या भावनेतून वैद्यकीय सेवा देत आहेत.शासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना उच्च दर्जाचे उपचार मोफत मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र धडपडत असतात.मोफत तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि आरोग्य जनजागृतीच्या माध्यमातून त्यांनी ‘संवेदनशील डॉक्टर’ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.त्यांचे अनेक शोधनिबंध (Research Papers) Pubmed आणि Scopus सारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

खेळाच्या मैदानातून राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप
डॉ. केदार हे केवळ स्टेथोस्कोपपुरते मर्यादित नसून, ते एक यशस्वी खेळाडू देखील आहेत. कबड्डी आणि शरीरसौष्ठव (Bodybuilding) या खेळांमध्ये त्यांनी आंतरराज्य आणि ऑल इंडिया आंतरविद्यापीठ स्तरावर मैदान गाजवले आहे. सध्या ते ‘इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन’ चे राष्ट्रीय पंच म्हणून कार्यरत आहेत.
“डॉ. निरंजन केदार यांनी आपल्या वडिलांच्या कष्टातून आणि कर्मवीरांच्या विचारातून प्रेरणा घेत समाजाची सेवा केली आहे. ‘ राज्यस्तरीय छावा’ हा पुरस्कार त्यांच्या आजवरच्या निस्पृह रुग्णसेवेची पावतीच आहे.”

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



