सांगोला (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोपसेवाडी येथे श्रीनंद हॉस्पिटल, सांगोला यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ७७ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी श्रीनंद हॉस्पिटलचे डॉक्टर मुळीक यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना वैयक्तिक स्वच्छता, आरोग्याची काळजी, स्वच्छतेच्या सवयी आणि निरोगी जीवनशैली याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आजारी विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार मोफत गोळ्या व औषधांचे वाटप करण्यात आले.

यावेळी श्री. विजय मोरे यांनी शासनाच्या विविध मोफत आरोग्य योजनांची माहिती दिली. रुग्णालयामध्ये विविध आजारांवर मोफत उपचार उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा मिळते. काही विशिष्ट आजारांमध्ये पाच लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च होत असल्यास त्यासाठीही योजनेच्या नियमानुसार मदत मिळू शकते, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी श्री. विजय अवताडे यांनीही सहकार्य केले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आले. या आरोग्य तपासणी शिबिरासाठी सहकार्य केल्याबद्दल श्रीनंद हॉस्पिटलचे डॉक्टर मुळीक, श्री. विजय मोरे, श्री. विजय अवताडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोपसेवाडीचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, सर्व पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि त्यांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


