सांगोला (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात रविवारी रात्रीच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. या दरम्यान तालुक्यातील नवी लोटेवाडी येथे एक दुर्दैवी घटना घडली. घरासमोरील आवारात अचानक वीज कोसळल्याने शेतकऱ्याची दुभती म्हैस जागीच ठार झाली. या घटनेमुळे पीडित शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नवी लोटेवाडी येथील लवटे वस्ती येथील रहिवासी श्री. बिभीषण आप्पा लवटे यांचे गट नंबर ४४५ मध्ये शेतजमीन व राहते घर आहे. रविवारी, दिनांक ७ जून २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास सांगोला परिसरात अचानक ढगांची गर्जना आणि विजांचा लखलखाट सुरू झाला.रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास लवटे वस्ती परिसरात प्रचंड आवाजासह वीज कोसळली. ही वीज बिभीषण लवटे यांच्या राहत्या घराच्या अगदी समोरील भागात बांधलेल्या म्हशीवर पडली. म्हैस काही क्षणातच जागीच गतप्राण झाली.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाचा आधार घेणाऱ्या लवटे कुटुंबाचे या घटनेमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.पीडित शेतकरी बिभीषण लवटे यांना शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून जास्तीत जास्त आर्थिक भरपाई मंजूर करावी, अशी आग्रही मागणी नवी लोटेवाडी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



