आमदार बाबासाहेब देशमुख, तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीचे निवेदन; धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिक हैराण
सांगोला (प्रतिनिधी):- इंदापूर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील कडलास (लिगाडेवाडी) हद्दीतील रस्ते कामाच्या संथ गतीने ग्रामस्थांच्या संयमाचा अंत पाहिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले हे काम तातडीने मार्गी लावावे, या मागणीसाठी कडलास ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख, तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे

मौजे कडलास गावच्या हद्दीत उत्तरेकडील कडलास ते सांगोला (लिगाडेवाडी) या मार्गावर अंदाजे १ किमी अंतराचा रस्ता सध्या ‘सिंगल लेन’ आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. ग्रामपंचायतीने संबंधित कार्यालयाशी वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली खरी, परंतु हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या संथ कामामुळे वाहतुकीला गंभीर अडथळा निर्माण होत असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अरुंद रस्ता आणि खड्ड्यांमुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून सर्वसामान्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

रस्त्याच्या दुतर्फा दाट लोकवस्ती आहे. या महामार्गावरून रात्रंदिवस अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. अर्धवट कामामुळे आणि उडालेल्या धुळीमुळे संपूर्ण परिसरात प्रदूषणाचे साम्राज्य पसरले आहे. वाढत्या उन्हामुळे धुळीचा त्रास अधिकच असह्य झाला असून, परिसरातील नागरिक आणि दुचाकीस्वारांमध्ये श्वसनाचे व डोळ्यांचे आजार बळावले आहेत. रस्ते विकास महामंडळाच्या या ढिसाळ नियोजनाबद्दल स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रशासनाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून कामाची गती वाढवावी. जर येत्या काही दिवसांत ठोस कार्यवाही झाली नाही, तर कडलास येथील ग्रामस्थ **’रास्ता रोको’** किंवा **’आमरण उपोषण’** करण्याच्या पवित्र्यात आहेत. जनतेच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळ सुरू राहिल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असेही यावेळी सांगण्यात आले.
हे निवेदन देतेप्रसंगी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मारुती लवटे, माजी उपसरपंच समाधान पवार, माजी उपसरपंच सुनील पाटील, गणपतराव देशमुख सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन नितीन गव्हाणे, विकास सेवा सोसायटीचे संचालक अरुण वाघमोडे, तसेच राहुल पाटील, महादेव लेंडवे, अशोक ठोकळे, निलेश अनुसे, प्रशांत तेली यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाला शेवटचा इशारा!
“कडलास (लिगाडेवाडी) येथील रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. धुळीमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले असून अपघातांत वाढ झाली आहे. प्रशासनाने तातडीने हे काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
— कडलास ग्रामस्थ

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



