सांगोला (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात स्पर्धात्मक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘ATSE’ स्पर्धा परीक्षेचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा सोमवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता सांगोला येथील सदानंद प्लाझा येथे उत्साहात पार पडणार आहे. गतवर्षी पार पडलेल्या या परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा या सोहळ्यात विशेष सन्मान केला जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा पाया मजबूत करणाऱ्या या परीक्षेला सांगोला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी सांगोला, महूद, कमलापूर, हातीद, धायटी, घेरडी, नाझरा, वाकी आणि कोळा या ९ प्रमुख परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती. या सर्व केंद्रांमधून शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

या सोहळ्याला प्रशासकीय, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. बाळासाहेब काटकर (माजी सभापती, पंचायत समिती सांगोला), मा. सागर पाटील (पोलिस उपनिरीक्षक – PSI, सांगोला),मा. नितीन इंगोले (उपनगराध्यक्ष, सांगोला),मा. तुकाराम भुसनर (व्हॉईस चेअरमन, खरेदी विक्री संघ), मा. दिनकर घोडके (जिल्हाध्यक्ष, पेन्शनर संघटना),मा. राजेंद्र यादव (अध्यक्ष, आपुलकी प्रतिष्ठान), मा. तानाजी बनसोडे (संचालक, सुभव करीअर अकॅडमी), मा. उमेश महाजन (पत्रकार, दैनिक सकाळ) हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील गुणवत्तेचा सन्मान व्हावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या गौरव सोहळ्यास सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक वृंद आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने आणि वेळेवर उपस्थित राहून बालपरीक्षकांचा उत्साह वाढवावा, असे आग्रहाचे आवाहन शालेय स्पर्धा परीक्षा तालुका समन्वयक श्री. समाधान केदार यांनी केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



