सांगोला (प्रतिनिधी): ८ मार्च या ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना, सांगोला प्रकल्प (कोळा) अंतर्गत नाझरे क्र. २ च्या अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ. माधुरी गणेश आदाटे यांना आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आज, ७ मार्च रोजी सोलापूर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. कुलदीप जंगम यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

सौ. माधुरी आदाटे यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांचे व्यवस्थापन, बालकांचे पोषण, लसीकरण आणि महिला सक्षमीकरण या विषयात अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने परिश्रम घेतले. त्यांच्या याच समर्पित सेवेची दखल घेत सोलापूर जिल्हा परिषदेने त्यांना या पुरस्कारासाठी निवडले.

या सन्मानाबद्दल सांगोला तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि नाझरे ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
“हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्या मार्गदर्शकांचा आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक अंगणवाडी सेविकेचा आहे. या पुरस्कारामुळे अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
— सौ. माधुरी आदाटे
या सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



