जनगणना कर्तव्यावर असताना निधन झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करा; सांगोल्यासह राज्यातील इतर घटनांचाही गांभीर्याने विचार व्हावा: आमदार बाबासाहेब देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

0

सांगोला (प्रतिनिधी): राष्ट्रीय जनगणना-२०२७ चे कर्तव्य बजावत असताना तीव्र उष्माघाताने निधन झालेल्या सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे आदर्श शिक्षक कै. राजेंद्र दामोदर ढोले यांच्या कुटुंबाला शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी. तसेच, केवळ सांगोलाच नव्हे, तर सध्याच्या भीषण उन्हात कर्तव्य बजावताना राज्यभरात इतरही अनेक ठिकाणी अशा दुर्दैवी घटना घडल्या असून, शासनाने या संपूर्ण परिस्थितीचा व्यापक विचार करून राज्यातील सर्वच शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी आग्रही मागणी सांगोला विधानसभेचे आमदार मा. श्री. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.

यासंदर्भात आमदार देशमुख यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सुपूर्द केले.

या अत्यंत संवेदनशील प्रकरणाबाबत माहिती देताना आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले की, कै. राजेंद्र ढोले सर हे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना उष्माघाताचे बळी ठरले आहेत. त्यांच्या अकाली निधनामुळे ढोले मळा (सांगोला) येथील त्यांचे कुटुंब संपूर्णपणे उघड्यावर पडले आहे. मात्र, ही समस्या केवळ सांगोला पुरती मर्यादित नसून, सध्या संपूर्ण राज्यात तापमान ४२ ते ४४ अंशांच्या पार गेल्याने जनगणना करणाऱ्या राज्यातील अनेक शिक्षकांना उष्माघाताचा तीव्र त्रास होत आहे आणि काही ठिकाणी शिक्षकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे शासनाने या सर्व प्रकरणांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

आमदार बाबासाहेब देशमुख यांनी निवेदनात मांडलेल्या प्रमुख मागण्या:

१. सांगोल्यातील पीडित कुटुंबाला तात्काळ मदत: राष्ट्रीय किंवा शासकीय कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या शासकीय नियमाप्रमाणे कै. ढोले सरांच्या कुटुंबाला देय असणारी अनुग्रह अनुदान (Ex-Gratia) रक्कम विनाविलंब मंजूर करून ती त्वरित अदा करण्यात यावी.

२. अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी: मृत शिक्षक कै. ढोले यांच्या कुटुंबातील पात्र व्यक्तीस प्राधान्य देऊन तातडीने अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे.

३. राज्यभरातील इतर घटनांचा विचार व सर्व्हे: सध्याच्या भीषण उन्हात राज्यातील इतरही भागांत ज्या शिक्षकांवर अशा दुर्दैवी घटना ओढवल्या आहेत, त्या सर्व ठिकाणची माहिती शासनाने तातडीने मागवून घ्यावी आणि त्या सर्व पीडित शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनाही समान न्याय देऊन आर्थिक व प्रशासकीय दिलासा द्यावा.

४. शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरण: उन्हाची तीव्र लाट लक्षात घेता जनगणनेच्या क्षेत्रीय (Field) कामाच्या वेळेत बदल करण्यात यावा किंवा शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा (ORS, प्रथमोपचार) तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here