सांगोला (प्रतिनिधी): संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगोला नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) नेते माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांचा धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. नगराध्यक्ष पदाच्या चुरशीच्या लढतीत आनंदा माने यांनी पाच हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला असून, नगरपरिषदेच्या २४ पैकी तब्बल १५ जागांवर विजय मिळवत शहाजीबापूंनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

विरोधकांना मोठा धक्का; राजकीय समीकरणे बदलली
या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) विरोधात शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि दीपक साळुंखे गट यांची ‘शहर विकास आघाडी’ एकत्र आली होती. मात्र, या तगड्या आघाडीला केवळ ०८ जागांवर समाधान मानावे लागले. शहाजीबापूंनी रचलेल्या चक्रव्यूहात दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा पराभव झाल्याने सांगोल्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार:
नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले स्पष्ट बहुमत शहाजीबापू पाटील यांच्या गटाने मिळवले आहे. विजयी उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे:
नगराध्यक्ष: आनंदा माने
प्रभाग १: राणी माने (बिनविरोध), रामचंद्र मदने
प्रभाग २: प्रशांत धनवजीर, वैशाली सावंत
प्रभाग ३: गोदाबाई बनसोडे, अरुण पाटील
प्रभाग ४: आशादेवी यावलकर, ज्ञानेश्वर तेली
प्रभाग ५: काशिलिंग गावडे, छाया मेटकरी
प्रभाग ६: सीमा सलगर, चैतन्य राऊत
प्रभाग ७: गणेश बनकर, शोभा फुले
प्रभाग ८: श्रद्धा साबळे, रमेश जाधव
प्रभाग ९: जुबेर मुजावर, दिव्यानी दौडे
प्रभाग १०: वैशाली झपके, विवेक पाटील
प्रभाग ११: सुजाता केदार (बिनविरोध), नितीन आबा इंगोले, अनिता निलेश केदार

कार्यकर्त्यांचा जल्लोष: ‘काय झाडी, काय डोंगर’च्या घोषणा
निकाल जाहीर होताच सांगोला शहरात गुलालाची उधळण करत विजयाचा मोठा उत्सव साजरा करण्यात आला. “काय झाडी, काय डोंगर, सगळं कसं ओक्के” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी शहाजीबापू पाटील आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष आनंदा माने यांची मिरवणूक काढली.
“हा विकासाचा विजय” – शहाजीबापू पाटील
विजयानंतर पत्रकारांशी बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, “सांगोल्याच्या जनतेने विकासाला साथ दिली आहे. शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. १५ नगरसेवक आणि नगराध्यक्ष असा आमचा पूर्ण संघ आता शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर काम करेल.”

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



