अजनाळे (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील अभिनव पब्लिक स्कूल मध्ये आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक भक्तिभाव आणि सांस्कृतिक उत्साहाने नटलेला बालदिंडी व रिंगण सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा, टाळ, मृदंग, भगवे पताके, तुळशी वृंदावन आणि भक्तीगीतांच्या गजरात सहभागी होत संपूर्ण परिसर विठ्ठलमय केला.
श्रद्धा, भक्ती आणि एकतेच्या पावलांनी चालत पंढरपूरच्या वारीचा हा अनुभव प्रत्येकाला आयुष्यात नवी दिशा देतो. आषाढी एकादशी ही हिंदू संस्कृतीतील एक पवित्र तिथी असून भक्तिभाव, समर्पण आणि सामाजिक एकतेचे प्रतीक मानली जाते. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी वारी करत निघतात. याच भावनेने प्रेरित होत अभिनव पब्लिक स्कूल मध्येही पारंपरिक पद्धतीने पायी दिंडी आणि रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला.
या वेळी विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपान, संत मुक्ताई आणि विठ्ठल-रुक्मिणी यांच्या वेशभूषा साकारून भक्तीभाव व्यक्त केला. संस्थाध्यक्ष मा.श्री लाडे सर, मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे मॅडम आणि उपस्थित पालक यांच्या हस्ते पालखी व प्रतिमांचे पूजन करून दिंडीला शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले रिंगण सोहळा आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेले अभंगगायन – ज्याने उपस्थितांना थेट पंढरपूरच्या वारीचा अनुभव दिला. टाळ, मृदंग, भगवे झेंडे आणि टाळ्यांच्या गजरात वातावरण भक्तीरसात न्हालं.
शेवटी पालक महिला व विद्यार्थ्यांनी फुगडी खेळत रिंगण सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. या संपूर्ण नयनरम्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
“नाम विठोबाचे लावत चला, पंढरीच्या वाटेवर चालत चला!”
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक